पोलीस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 23:47 IST2019-01-05T23:47:16+5:302019-01-05T23:47:35+5:30

चोरी प्रकरणातील तपासात मदत करण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेणाऱ्या बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदारास रंगेहाथ पकडले.

Police hawala 'ACB' in the net | पोलीस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

पोलीस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : चोरी प्रकरणातील तपासात मदत करण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेणाऱ्या बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदारास रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या बाजूच्या रस्त्यावर केली.
शंकर राठोड (रा.बीड) असे लाच घेणाºया हवालदाराचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयातून पेनड्राईव्ह चोरी झाला होता. यात एका वकिलाला ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयाने कोठडीही दिली होती. याच प्रकरणात त्याचा मोबाईल आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली होती. या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी राठोड यांनी संबंधिताकडे दहा हजार रूपयांची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराने राठोड यांना लाच न देता थेट जालना गाठले आणि तेथील एसीबी कार्यालयात तक्रार दिली. २ तारखेला तक्रार देताच टीम दोन दिवस बीडमध्ये तळ ठोकून होती.
शनिवारी दुपारीच राठोड यांनी दहा हजार रूपये मागितले. ही लाच शिवाजीनगर ठाण्याच्या बाजूला असणाºया एका रूग्णालयासमोर घेण्याचे ठरले. तक्रारदाराकडून १० हजारांची रक्कम स्विकारताच एसीबीने झडप घालत त्यांना ताब्यात घेतले. राठोड यांना रात्री उशिरा बीडच्या एसीबी कार्यालयात बसविले होते. गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.
जालना टिमने केली कारवाई
तक्रारदाराने बीडमध्ये तक्रार न देता जालना येथील कार्यालयात दिली. दोन दिवस वॉच ठेवल्यानंतर शनिवारी सायंकाळी राठोड त्यांच्या जाळ्यात अडकले. जालना कार्यालयातील टिम बीडकार्यालयात रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होती.

Web Title: Police hawala 'ACB' in the net