पोलीस दलाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, जखमा मात्र आयुष्यभरासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:37 IST2021-08-13T04:37:35+5:302021-08-13T04:37:35+5:30
बीड : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी फ्रंट फूटवर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाला पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या ...

पोलीस दलाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, जखमा मात्र आयुष्यभरासाठी
बीड : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी फ्रंट फूटवर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाला पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा अधिक तडाखा बसला. पहिल्या व दुसऱ्या लाटेत मिळून आतापर्यंत चारशेवर अधिकारी व अंमलदारांना कोरोनाने गाठले. सर्व अधिकाऱ्यांनी कोरोनावर मात केली; पण कोरोनाला हरविताना सात अंमलदार दुर्दैवाने जीवनाची बाजी हारले. आता दुसरी लाट ओसरत असताना पोलीस दलाचीही कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, या संकटात अनेक पोलिसांच्या आयुष्यावर न बुजणारे ओरखडे उमटले.
कोरोनाने जिल्ह्यात एंट्री केल्याच्या पहिल्या दिवसापासून प्राणाची पर्वा न करता पोलिसांनी हिमतीने कर्तव्य पार पाडले. त्यामुळेच पहिल्या लाटेत जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी होता. दुसऱ्या लाटेत सुसाट सुटलेल्या कोरोना संसर्गाने आरोग्य यंत्रणेची अक्षरश: त्रेधा उडाली. कोरोनामुळे पोलिसांचे दैनंदिन कामकाज प्रभावित झाले. तपासणी नाके, गस्त, संचारबंदी आदेशाच्या अंमलबजावणीसोबतच ऑक्सिजन प्रकल्पांची सुरक्षा, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टँकरला बंदोबस्त अशी कामे पोलिसांना करावी लागली. दोन्ही लाटांत मिळून ५६ अधिकारी व ३६० अंमलदारांना कोरोना संसर्ग झाला. काही पोलिसांची कुटुंबेही बाधित झाली. यात अनेकांनी जीवलग गमावले तर पोलीस दलातील सात योद्ध्यांना कोरोनाने हिरावून नेले. ११ ऑगस्ट अखेर एक अधिकारी व दोन अंमलदार असे केवळ तिघेच बाधित आहेत. त्यामुळे पोलिसांची कोरोनामुक्ती दृष्टिक्षेपात आहे.
...
एक नजर आकडेवारीवर...
२१७० एकूण अंमलदार
१८० एकूण अधिकारी
....
असे झाले लसीकरण
पहिला डोस
१६९ अधिकारी
१९२६ अंमलदार
दोन्ही डोस
१२४ अधिकारी
१५४६ अंमलदार
......
कोरोना कालावधीत ८० टक्के मनुष्यबळ कर्तव्यावर होते. अधिकारी व अंमलदारांनी प्राणाची बाजी लावून कर्तव्य बजावले. पोलिसांसाठी स्वतंत्र क्वारंटाइन सेंटर सुरू केले होते. दुर्दैवाने सात अंमलदारांचा मृत्यू झाला. लसीकरणावर भर दिल्याने आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
- आर. राजा, पोलीस अधीक्षक
....
सातपैकी चौघांच्या वारसांना अनुदान
आष्टी ठाण्यातील पोलीस नाईक शंकर कळसाने, युसूफवडगाव ठाण्यातील हवालदार राजेंद्र वाघमारे, मुख्यालयातील हवालदार सोपान जाधव, अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यातील महादेव जाधव, बिनतारी संदेश विभागाचे हवालदार नाथा गायसमुद्रे, माेटार वाहन विभागातील अंमलदार दीपक सूळ व बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोलीस नाईक सुबराव जोगदंड यांनी कोरोनामुळे प्राण गमावले. यापैकी आतापर्यंत चौघांच्याच वारसांना ५० लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळाल्याची माहिती पोलीस कल्याण विभागाचे सहायक निरीक्षक योगेश खटकळ यांनी दिली.
....
120821\12bed_1_12082021_14.jpg
आर. राजा