अंगणवाडीच्या खिचडीतून विषबाधा; ११ बालकांना मळमळ उलटीचा त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 18:08 IST2025-02-08T18:07:36+5:302025-02-08T18:08:24+5:30
माजलगाव तालुक्यातील फुलसिंग नगर तांडा येथील घटना

अंगणवाडीच्या खिचडीतून विषबाधा; ११ बालकांना मळमळ उलटीचा त्रास
- पुरुषोत्तम करवा
माजलगाव ( बीड) : तालुक्यातील टाकरवन जवळ असलेल्या फुलसिंग नगर तांडा येथील अंगणवाडीत शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास खिचडी खाल्ल्याने ११ बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या बालकांवर माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
टाकरवन जवळ असलेल्या फुलसिंग नगर तांडा या ठिकाणी असलेल्या अंगणवाडीत २९ बालकी असून त्यापैकी ७ बालके शनिवारी उपस्थित होते. या अंगणवाडीतील मुलांबरोबर शेजारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थी या ठिकाणी खिचडी खाण्यासाठी आले होते. खिचडी खाऊन ही बालके आपापल्या घरी गेली. त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास अंगणवाडीतील ७ व ४ जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या बालकांना अचानक मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. अंगणवाडी सेविका कविता राठोड यांनी सरपंच सुनील तर व उपसरपंच दयानंद बोबडे यांना याची माहिती दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका पाठवून बालकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सर्वांवर उपचार करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. घुबडे यांनी सांगितले.
अंगणवाडीत शिकणारी श्रावणी नवनाथ राठोड (वय ३ ) संध्या लखन राठोड (वय ५ ), पल्लवी अतुल राठोड (वय ५ ), प्रीतम रवींद्र राठोड (वय ५ ),देवांश अजय राठोड (वय १८ महिने ) रा. फुलसिंग तांडा त्याचबरोबर आर्यन परमेश्वर राठोड (वय ४ ), आरव परमेश्वर राठोड (वय ३ ) रा. टाकरवन येथील बालके आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे अक्षर लहू चव्हाण, देवांश अजय राठोड (वय ३ ) रा. वारोळा , इशिता देविदास धनगाव (वय ७ ), प्रथमेश दिलीप पवार (वय ७) व प्रांजल दिलीप पवार(वय ८ ) हे सर्व रा. फुलसिंग तांडा येथील रहिवासी आहेत.
रात्रभर देखरेख
विषबाधा झालेल्या बालकांची तब्येत स्थिर आहे. रात्रभर डॉक्टरांच्या देखरेखित ठेवण्यात येणार आहे.
- डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी, माजलगाव