अंबाजोगाई-वाघाळा रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST2021-07-13T04:07:57+5:302021-07-13T04:07:57+5:30
रस्ता निसरडा झाल्याने अपघात सुरूच अंबाजोगाई - अंबाजोगाई ते वाघाळा हा अंबाजोगाई शहरातील वर्दळीचा रस्ता. गेल्या चार वर्षांपासून ...

अंबाजोगाई-वाघाळा रस्त्याची दुर्दशा
रस्ता निसरडा झाल्याने अपघात सुरूच
अंबाजोगाई - अंबाजोगाई ते वाघाळा हा अंबाजोगाई शहरातील वर्दळीचा रस्ता. गेल्या चार वर्षांपासून कामाविना रखडला असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत . याचा मोठा त्रास या परिसरातील रहिवाशांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. आता पावसाने या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साठल्याने व रस्ता निसरडा झाल्याने या रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात होत आहेत.
अंबाजोगाई ते वाघाळा या रस्त्यावर शहरात नव्याने झाल्याने अनेक वसाहती आहेत. योगेश्वरी नगरी पासून पाच किमी अंतरावर मोठ्या प्रमाणात घरांची संख्या वाढली. मात्र या परिसरात रस्त्यांचा मोठा अभाव आहे. मुख्य असणारा अंबाजोगाई ते वाघाळा रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. शेतकऱ्यांसाठी ही हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या रस्त्यावरील रहदारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे. त्यातच पडणारा पाऊस याचा मोठा त्रास या परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. वृद्ध, महिला, लहान मुले व नागरिकांना आपला जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. पावसामुळे होत असलेला चिखल व निसरडा रस्ता यामुळे लहान-मोठे अपघात या परिसरात नित्याचेच झाले आहेत. चार वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम झाले होते. मात्र, काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा रस्ता पुन्हा खराब झाला. सध्या तर या रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. या परिसरातील नागरिकांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. रहदारीचा असणारा हा रस्ता बांधकाम विभागाने तत्काळ सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नरसिंग दरगड,मिलींद बाबजे,सतीश दहातोंडे,गणेश शिंदे यांनी केली आहे.
या संदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याकडे विचारणा केली असता. या रस्त्याच्या कामासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
120721\img-20210603-wa0122.jpg
अंबाजोगाई-वाघाळा रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे