प्लास्टिक बंदीला ठेंगा; बीड वगळता इतर पालिका, नगर पंचायतकडून कारवाईस आखडता हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:23 IST2018-06-27T00:22:50+5:302018-06-27T00:23:26+5:30
राज्य शासनाने घेतलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला बीड वगळता जिल्ह्यात ठेंगा मिळाला आहे. केवळ बीड नगर पालिकेने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. इतर १० नगर पालिका व नगर पंचायतींचे अद्याप खातेच उघडले नसल्याचे समोर आले आहे. पालिका व पंचायतींच्या ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्षामुळे प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येते.

प्लास्टिक बंदीला ठेंगा; बीड वगळता इतर पालिका, नगर पंचायतकडून कारवाईस आखडता हात
बीड : राज्य शासनाने घेतलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला बीड वगळता जिल्ह्यात ठेंगा मिळाला आहे. केवळ बीड नगर पालिकेने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. इतर १० नगर पालिका व नगर पंचायतींचे अद्याप खातेच उघडले नसल्याचे समोर आले आहे. पालिका व पंचायतींच्या ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्षामुळे प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येते. जिल्हा प्रशासनाकडूनही याचा आढावा घेतला जात नसल्याने त्यांना एक प्रकारे पाठबळच मिळत असल्याचा आरोप होत आहे.
प्लास्टिक बंदीचा निर्णय घेऊन चार दिवसांचा कालावधी उलटला. बीड नगर पालिकेने पहिल्या दिवसापासूनच कारवाईस सुरूवात केली. भाजी मंडई, कारंजा इ. भागांतील दुकानांची झाडाझडती घेतली. पहिल्या दिवशी ११ जणांना ५० रूपये दंड आकारला. दुसऱ्या दिवशी दोघांना ५०० रूपये, तिसºया दिवशी एकाला पाच हजार रूपये तर चौथ्या म्हणजेच मंगळवारी सुभाष रोडवरील एका दुकानाला पाच हजार रूपयांचा दंड वसूल करून शेकडो किलो कॅरीबॅक जप्त केली. मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता मंगेश भंडारी, जनार्दन वडमारे, सुरेंद्र परदेशी, विजय शेळके, शेख शब्बीर, शेख अजहर यांनी केली.
जिल्ह्यात केवळ बीड नगर पालिकेनेच दुकानांची तपासणी करून कारवाया करण्यास सुरूवात केल्याचे दिसते. अंबाजोगाई, माजलगाव, परळी, गेवराई या शहरांमध्ये सर्रासपणे मोठ मोठी दुकाने प्लास्टिकचा वापर करीत आहेत. असे असले तरी पालिकेकडून अद्याप तपासणीही करण्यात आली नाही. त्यांच्याकडून एकही कारवाई न झाल्याने पालिकाच आता संशयाच्या भोवºयात आहे.
जिल्हा प्रशासनाचा कानाडोळा
बीड वगळता इतर पालिकांनी एकही कारवाई केली नाही, तरी नगर विकास विभागाकडून त्यांना साधी विचारणाही करण्यात आली नसल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे प्लास्टिकवर कारवाई न करणाºया पालिका, पंचायतींना प्रशासनच पाठीशी घालत असल्याचे दिसून येते.
धारूरमध्ये स्पीकरद्वारे आवाहन
धारूरमध्ये अद्याप एकही कारवाई झाली नसली तर प्लास्टिकचा वापर करून नये, असे आवाहन लाऊड स्पीकरद्वारे केले जात आहे. परंतु प्रत्यक्षात याचा प्रभाव फारसा होताना दिसत नाही. सर्वत्र प्लास्टिकचा खुलेआम वापर आहे.
बीड पालिका अव्वल
बीड पालिकेकडून रोज दुकानांची झडती घेतली जात आहे. दंड आकारून प्लास्टिकही जप्त केले जात आहे. जिल्ह्यात केवळ बीड पालिकाच सध्या दंड वसूल करण्यात अव्वल असल्याचे दिसते. मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्याकडून रोज कारवाईचा आढावा घेतला जात आहे. तसेच पथकांनाही कडक सुचना दिल्यानेच कारवाया होत असल्याचे दिसते. इतर पालिका, पंचायतींनी बीड पालिकेचा आदर्श घेण्याची गरज आहे.
अंबाजोगाईत दिली समज
अंबाजोगाई नगर पालिकेकडून केवळ दुकानदार, व्यापाºयांची केवळ समजूत काढली जात आहे. कारवाई किंवा दंड वसूल करण्यासाठी त्यांच्याकडून आखडता हात घेतला जात आहे. त्यामुळेच प्लास्टिकचा खुलेआम वापर होत आहे. पालिका यावर निर्बंध घालण्यात कुचकामी ठरत आहे. याचाच फायदा घेऊन आजही शहरामध्ये प्लास्टिकचा वापर होताना दिसून येत आहे.