नवीन वसाहतींमध्ये पक्के रस्ते तयार करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:06+5:302021-07-24T04:20:06+5:30
पायाभूत सुविधांचाही मोठा अभाव विविध समस्यांमुळे रहिवासी त्रस्त अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरालगत पोखरी रोड व वाघाळा रोड परिसरात मोठ्या ...

नवीन वसाहतींमध्ये पक्के रस्ते तयार करावेत
पायाभूत सुविधांचाही मोठा अभाव
विविध समस्यांमुळे रहिवासी त्रस्त
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरालगत पोखरी रोड व वाघाळा रोड परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. या भागात पक्के रस्ते तयार करण्यात यावेत, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.
अंबाजोगाई शहरालगत पोखरी रोड व वाघाळा रोड, गीत्ता रोड, शेपवाडी परिसर, मोरेवाडी परिसर, जोगाईवाडी परिसर, लगत नवीन वसाहत सिल्वर सिटी, बनाईनगर, शिक्षक वसाहत, राधानगरी, पिताजीनगरी व विविध अपार्टमेंट व रोहाऊस यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामे व मोठ्या वसाहती निर्माण झाल्या. लाखो रुपये खर्च करून नागरिकांनी घराचे बांधकाम केले, तर अनेकांनी बांधकाम व्यावसायिकांकडून घरे विकत घेतली. वसाहतींची निर्मिती झाल्यानंतर या परिसरात पक्के रस्ते होतील अशी अपेक्षा या भागातील रहिवाशांना होती. मात्र, पाच ते सात वर्षांचा कालावधी लोटला तरीही या परिसरात अजूनही नाल्या, रस्ते, पथदिवे या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.
या भागातील रस्ते अतिशय कच्चे असून, त्यांची दैनावस्था झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीही या भागातील रस्त्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे या वसाहतीमध्ये राहणारे महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक शाळेत जाणारी मुले-मुली चिखलातून गटारीच्या पाण्यातून मार्ग काढून ये-जा करतात. या भागातील परिसर काळ्या मातीचा असल्याने चिखल मोठ्या प्रमाणात होतो. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची डबकी साचली आहेत. चिखलामुळे रस्ते निसरडे होतात. परिणामी दुचाकी वाहनेही चालवता येत नाहीत. या रस्त्याने चालणेही मोठ्या जिकिरीचे बनते. दुचाकी घसरून या परिसरात लहान-मोठ्या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.
ना नाल्या, ना रस्ते ना पथदिवे, अशा गैरसोयीमुळे या भागातील रहिवाशांना आदिवासी वस्त्यांप्रमाणे राहण्याची वेळ आली आहे. या परिसरातील रहिवाशांनी अनेकदा एकत्रित येऊन लोकसहभागातून मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजविले. मात्र, झालेल्या मोठ्या पावसाने टाकलेला मुरूमही वाहून गेल्याने या भागाची दयनीय अवस्था झाली आहे. या निर्माण होणाऱ्या समस्यांकडे कोणीही लक्ष देत नसल्याने रहिवाशांची मोठी कुचंबणा होऊ लागली आहे.
कर भरूनही सुविधा नाहीत
गेल्या काही वर्षांमध्ये शहरात नवीन वसाहती निर्माण झालेल्या आहेत. अनेक वर्षांपासून या भागात राहत असताना ग्रामपंचायतीने अद्यापही या भागात सुविधा दिलेल्या नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात या भागातील रहिवाशांचे हाल होतात. मात्र, कोणीही त्याची दखल घेत नाही. नियमित कर भरूनही जर भौतिक सुविधा मिळत नसतील तर उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
230721\20210715_010641.jpg
नवीन वसाहती कडे जाणारा रस्ता