डॉक्टरच्या चुकीमुळे रुग्णाचा मृत्यू ? माजलगावच्या रुग्णालयात नातेवाईकांचा धुडगूस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 20:59 IST2025-10-21T20:58:34+5:302025-10-21T20:59:10+5:30
शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती

डॉक्टरच्या चुकीमुळे रुग्णाचा मृत्यू ? माजलगावच्या रुग्णालयात नातेवाईकांचा धुडगूस!
माजलगाव ( बीड) : शहरातील एका रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याचा प्रकार सोमवारी घडला. दरम्यान, त्यानंतर काहीवेळात डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळेच या ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी दवाखान्यात धुडगुस घातल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराज चौकातील असलेल्या माऊली हार्ट केअर या हॉस्पिटलमध्ये काही दिवसापूर्वी राजेवाडी येथील बाळासाहेब बाबासाहेब बोबले या रुग्णाला छातीत दुखत असल्यामुळे सोमवारी सकाळी रुग्णालयात आणले होते. उपचारादरम्यान डॉ. राधाकृष्ण डाके चुकीचे उपचार व हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळे बाळासाहेब बोबले याचा मृत्यू झाला असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शहर पोलिसात डॉ. राधाकृष्ण डाके यांचे विरोधात तक्रार दिली होती. दरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धुडगुस घालून डॉक्टरांना शिवीगाळ केल्याची घटना घडली.
दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी शहर पोलिसात तक्रार दिल्याने शहर पोलिसांनी गुन्हा नोंद करत मयताचे अंबाजोगाई मेडिकल बोर्डा समोर मंगळवारी शवविच्छेदन केले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने यांनी दिली.
याबाबत डॉ. राधाकृष्ण डाके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की , सदरील रुग्णास पंधरा दिवसात दोनदा हृदयविकाराचा झटका आला होता. यात त्याचा मृत्यू झाला. यात रुग्णाच्या नातेवाईकांची काही तक्रार नसून अज्ञात लोकांनी रुग्णालयात धुडगुस घातला.