Passenger young man falls unconscious driver brings bus to hospital in Beed..! | प्रवासी तरुण पडला बेशुद्ध चालकाने बस आणली थेट रुग्णालयात..!
प्रवासी तरुण पडला बेशुद्ध चालकाने बस आणली थेट रुग्णालयात..!

ठळक मुद्दे बार्शी रोडवरुन बस थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आली.

बीड :  एस.टी.बसमधून प्रवास करत असतांनाच बीडनजीक बस आलेली असतांना एका तरुण प्रवाशाला अचानक चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला. हा प्रकार लक्षात येताच चालक आणि वाहकाने समय सुचकता दाखवत बस थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात आणत त्या तरुणाला उपचार मिळवून दिले.

झाले असे की, परळी-पाटोदा ही राज्य परिवहन महांडळाची बस क्र. (एम एच 20 बी एल 0807) आज मंगळवारी (दि.17) सकाळी परळी येथून प्रवाशांना घेवून पाटोद्याकडे निघाली होती. दिंद्रुड येथून आत्माराम व्हरकटे (25, रा.व्हरकटवाडी, ता.धारुर) हा तरुण पुढील प्रवासासाठी बसमध्ये बसला होता. सकाळी बस बीड नजीक आलेली असतांना त्या तरुणाला अचानक चक्कर आली व तो सिटवरच बेशुद्ध पडला. 

बसमधील प्रवाशी तसेच चालक-वाहकाच्या हा प्रकार लक्षात येताच बार्शी रोडवरुन बस थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आली. तातडीने तरुणाला खाली उतरवत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर डॉक्टर मनोज घडसिंग व त्यांच्या टीमने उपचार केले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर तो तरुण रुग्णालयातून बाहेर पडला. मात्र प्रवाशी बेशुद्ध पडताच त्याला उपचार मिळवून देण्यासाठी चालक-वाहकांनी दाखवलेल्या समय सुचकतेचे रुग्णालयातील कर्मचार्‍यांसह नागरिकांकडून कौतुक झाले.

Web Title: Passenger young man falls unconscious driver brings bus to hospital in Beed..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.