Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध परळी न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 14:46 IST2022-01-06T14:38:22+5:302022-01-06T14:46:38+5:30
Raj Thackeray : २००८ सालच्या एका प्रकरणात जामीन मिळूनही सतत तारखेला न्यायालयात गैरहजर राहिले

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध परळी न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट !
परळी ( बीड ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) हे जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश परळी न्यायालयाने बुधवारी दिला आहे.
राज ठाकरे यांना २२ ऑक्टोबर २००८ रोजी मुंबई येथे अटक झाली होती. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. परळीत देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या अटकेचा निषेध केला. यादरम्यान, कार्यकर्त्यांनी सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पॉइंट येथे दगडफेक केली. दगडफेकीत बसचे समोरील काच फुटून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते.
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, चिथावणीखोर भाष्य केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल गु.रं.नं 208/2008अन्वये गुन्हा कलम 143 427 336 109 भा दं वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी पोलीसांनी तपास करुन राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
याप्रकरणी राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या प्रकरणाच्या तारखेला न्यायालयात सतत ते सातत्याने गैरहजर राहिले आहेत. यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी वैजनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ.एम.एम.मोरे-पावडे यांनी दिला आहे.