परळी-बीड-नगर रेल्वे २०१९ पर्यंत धावणार- मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:41 IST2018-02-16T00:38:14+5:302018-02-16T00:41:11+5:30
परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाचे काम वेगाने चालू असून, केंद्राप्रमाणेच राज्य शासनानेही या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. २०१९ पर्यंत या मार्गावरुन रेल्वे धावेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायणगडावर विकास कामांचे भूमिपूजन करताना व्यक्त केला.

परळी-बीड-नगर रेल्वे २०१९ पर्यंत धावणार- मुख्यमंत्री
बीड : परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाचे काम वेगाने चालू असून, केंद्राप्रमाणेच राज्य शासनानेही या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. २०१९ पर्यंत या मार्गावरुन रेल्वे धावेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायणगडावर विकास कामांचे भूमिपूजन करताना व्यक्त केला.
अध्यक्षस्थानी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होते. बीडजवळच असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगडावरील २५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन गुरुवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी ते म्हणाले, बीड जिल्ह्यासाठी परळी-बीड-नगर हा रेल्वेमार्ग जिव्हाळ्याचा विषय आहे. या प्रकल्पासाठी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर पाठपुरावा केला, त्यांचे हे स्वप्न २०१९ पर्यंत पूर्ण होईल, यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे जो काही निधी लागेल, तो दिला जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत आशीर्वाद घेण्यासाठी मी नारायणगडावर आलो होतो. इथे ‘नगद’ आशीर्वाद मिळतो, अशी अख्यायिका आहे. माझ्या बाबतीतही ते सत्यात उतरले. भाजपची सत्ता आली आणि मी मुख्यमंत्री झालो. अतिशय निसर्गरम्य परिसरात हे तीर्थक्षेत्र वसलेले आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी आणखीही दुस-या टप्प्यात भरीव मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. आ. विनायक मेटे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परिश्रम करुन पाठपुरावा केला. त्यांनी या गडाच्या विकासासाठी केलेल्या आराखड्यास २५ कोटी रुपयांची मंजुरी दिली. याशिवाय या गडाला विकसित करण्यासाठी सर्वच खात्याच्या विविध विकास योजना इथे राबविल्या जातील, असे ते म्हणाले.
कर्जमुक्तीसाठी उर्वरित शेतक-यांचे अर्ज भरुन घेऊ
कर्जमुक्तीचा लाभ ५० लाख शेतक-यांना आतापर्यंत झाला आहे. बीड जिल्ह्यातही १ लाख ५ हजार शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी आहेत. ज्या कुणाचे कर्जमुक्तीसाठी अर्ज दाखल झाले नाहीत, त्यांचेही अर्ज भरुन घेऊन पात्र शेतक-यांना कर्जमुक्ती दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.