'प्रत्येक परीक्षेसाठी पप्पा सोडायला येत'; वैभवीने अश्रूंना केली वाट मोकळी, दु:ख झेलत दिला पेपर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 11:25 IST2025-02-12T11:24:08+5:302025-02-12T11:25:20+5:30
दोन महिने अभ्यासापासून दुरावलेल्या वैभवीने अखेर हिमतीने बारावीची परीक्षा दिली.

'प्रत्येक परीक्षेसाठी पप्पा सोडायला येत'; वैभवीने अश्रूंना केली वाट मोकळी, दु:ख झेलत दिला पेपर
केज : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याच्या दुःखातून अद्यापही न सावरलेली त्यांची कन्या वैभवी हिने मंगळवारी बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर दिला. परीक्षा केंद्रावर वडील सोडवायला न येता दिलेली ही पहिलीच परीक्षा असल्याची प्रतिक्रिया वैभवीने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
वैभवी देशमुख हिचे अहिल्यानगर जिल्ह्यातील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात विज्ञान शाखेतून शिक्षण सुरू आहे. लातूर पॅटर्न राज्यासह देशात गाजत असल्यामुळे बारावीची तयारी वैभवी लातूर येथे करीत असताना तिचे पित्याचे छत्र हरपले. ९ डिसेंबर रोजी गुन्हेगारांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या केली. त्यामुळे बारावी बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या वैभवीवर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन महिने अभ्यासापासून दुरावलेल्या वैभवीने अखेर हिमतीने बारावीची परीक्षा दिली.
अश्रूंना केली वाट मोकळी
आमच्या प्रतिनिधीने मंगळवारी सायंकाळी ७ वाजता मस्साजोग येथे जाऊन वैभवीची भेट घेत तिची प्रतिक्रिया जाणून घेतली. डोळ्यांमध्ये भरून आलेल्या अश्रूंना वाट करून देत प्रत्येक परीक्षेसाठी पप्पा मला सोडवायला परीक्षा हॉलपर्यंत यायचे; परंतु आज बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पित्याची उणीव प्रकर्षाने व तीव्रतेने जाणवली. दोन महिन्यांपासून आमच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे अभ्यासात मन लागत नव्हते. तरीही मी आत्मविश्वासाने बारावीच्या परीक्षेला सामोरे जात १२ वीच्या परीक्षेचा पहिला पेपर छान सोडविल्याची भावना वैभवी देशमुख हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
२७ तारखेला परीक्षा संपणार
११ फेब्रुवारी रोजी सुरू झालेली परीक्षा २७ फेब्रुवारी रोजी संपणार असून, परीक्षेच्या दिवशी काका धनंजय देशमुख परीक्षा केंद्रावर पोहोचवायला आल्याचे वैभवीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.