बिबट्याच्या दर्शनाने सोनहिवरा परिसरात दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 17:45 IST2018-03-24T17:45:26+5:302018-03-24T17:45:26+5:30
सोनहिवरा गावातील भवानी आई शिवारात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांना बिबट्या आढळून आला. यामुळे या भागात दहशतीचे वातावरण आहे.

बिबट्याच्या दर्शनाने सोनहिवरा परिसरात दहशत
परळी ( बीड ) : तालुक्यातील सोनहिवरा गावातील भवानी आई शिवारात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांना बिबट्या आढळून आला. यामुळे या भागात दहशतीचे वातावरण आहे. याबाबत माहिती मिळताच वन परिक्षेञ अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी व परळी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा शोध घेतला. मात्र त्यांना बिबट्या आढळून आला नाही.
सोनहिवरा येथील वेणुबाई मुंडे, कोंडीबा मुंडे, जनार्धन मुंडे, नामदेव मुंडे हे शेतात काम करत असतांना त्यांना अचानक काही अंतरावर बिबट्या दिसला. बिबट्याच्या शिवारातील दर्शनाने घाबरलेली शेतकरी हातातील काम सोडुन गावाकडे निघून आले. यानंतर ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून परळी ग्रामीण पोलिस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात धाव घेतली. दोन्ही पथकाने गावकऱ्यांकडून माहिती घेऊन घटनास्थळी बिबट्याचा शोध घेतला. परंतु त्यांना बिबट्याच्या खुणा दिसून आल्या नाहीत. माञ, बिबट्या आल्याचे गावकऱ्यांनी पाहिले आहे अशी माहिती सोनहिवऱ्याचे युवक कार्यकर्ते सचिन मुंडे यांनी दिली.
शेतकरी दहशतीत
बिबट्याच्या खुणा आढळून आल्या नसल्या तरी शेतकरी माञ बिबट्याच्या दहशतीमुळे हादरून गेले आहेत. वनपरिक्षेञ अधिकारी आर.बी. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, येथे बिबट्या येवून गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जावून बिबट्याचा शोध घेतला. परंतु तो आढळून आला नाही किंवा त्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाही. माञ बिबट्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दौनापूर, मांडवा येथे ही चार महिन्यांपूर्वी बिबट्या दिसला असल्याची माहिती आहे. हाच बिबट्या सोनहिवऱ्यात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.