पैठण-पंढरपूर पालखी महामार्गाचा तिढा सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST2021-06-04T04:25:53+5:302021-06-04T04:25:53+5:30
शिरूर कासार : पैठण-पंढरपूर हा पालखी मार्ग म्हणजे वारकऱ्यांसह सर्वांच्या अस्मितेचा मार्ग. मात्र मध्यंतरी कामात समन्वयाअभावी खोडा पडला आणि ...

पैठण-पंढरपूर पालखी महामार्गाचा तिढा सुटला
शिरूर कासार :
पैठण-पंढरपूर हा पालखी मार्ग म्हणजे वारकऱ्यांसह सर्वांच्या अस्मितेचा मार्ग. मात्र मध्यंतरी कामात समन्वयाअभावी खोडा पडला आणि कामच बंद झाले. हे काम सुरू व्हावे यासाठी आ.सुरेश धस यांनी बुधवारी अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये सकारात्मक चर्चा घडवून आणल्यानंतर पालखी मार्गाचा तिढा सुटला. आता पूर्ववत काम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पैठण-पंढरपूर हा रस्ता जसा वारकऱ्यांसाठी अस्मितेचा तसाच तो औरंगाबादला जाण्यासाठीसुद्धा जवळचा मार्ग असून सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाले. काही ठिकाणी कामाने गती घेतली होती. काही ठिकाणी रस्ता काम झाले होते; मात्र अशातच शेतकऱ्यांच्या मावेजाचा प्रश्न उपस्थित झाला आणि कामात खोडा पडला. हा प्रश्न सुटल्याशिवाय रस्त्याचे काम मार्गी लागत नाही आणि सर्वांनाच त्रासाला कारणीभूत ठरेल म्हणून आ.सुरेश धस यांनी या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. बुधवारी सर्व विभागांचे अधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांना सोबत घेऊन थेट त्या त्या गावांत जाऊन अडचणी व प्रश्न समजून घेत त्यावर चर्चा करून पालखी मार्गातील अडसर दूर केला. यावेळी उपजिल्हाधिकारी,सर्व विभागांचे अधिकारी,पी. व्ही. आर. कंपनीचे अभियंता,सार्वजनिक बांधकाम अभियंता, भूसंपादन अधिकारी, ॲड. भाग्यश्री ढाकणे, कृष्णा पानसंबळ, माजी सभापती निवृत्ती बेदरे, नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसरडा,कल्याण तांबे, सुरेश उगलमुगले, ज्या त्या गावचे सरपंच , सदस्य,ग्रामस्थ,शेतकरी उपस्थित होते.
तीन-चार वर्षांपासून सुरू असलेले हे काम शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी आपली जमीन क्षेत्र व घर जात असून त्याचे मोजमाप करून योग्य तो मावेजा देण्याच्या मागणीसाठी काम अडवले होते. अर्धवट पडलेले काम अपघाताला कारणीभूत ठरून जीव गमावण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती तरी मार्ग निघत नव्हता.
आ. सुरेश धस यांनी तालुक्यातील घोगसपारगाव ,माळेगाव (च) ,उकिर्डा (च) ,दहिवंडी ,शिरूर ,राक्षसभुवन ,खोलेवाडी येथील शेतकरी ग्रामस्थांबरोबर चर्चा करून शंका निरसन करून अडलेला मार्ग मोकळा झाला आहे.आता लवकरच पुन्हा मोजमाप प्रक्रिया पूर्ण करून मावेजा मिळवून देण्यात येईल असा विश्वास प्रशासन व आ.धस यांनी दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
===Photopath===
030621\vijaykumar gadekar_img-20210603-wa0006_14.jpg