अंबाजोगाई शहरात डेंग्यू, चिकुनगुन्याचा प्रादुर्भाव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:38 IST2021-08-12T04:38:24+5:302021-08-12T04:38:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : शहरात अनेक वसाहतींमध्ये कचरा, सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे डेंग्यू व चिकुनगुन्याच्या रुग्णांत ...

अंबाजोगाई शहरात डेंग्यू, चिकुनगुन्याचा प्रादुर्भाव वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : शहरात अनेक वसाहतींमध्ये कचरा, सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे डेंग्यू व चिकुनगुन्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. तरी नगरपरिषदेने तातडीने धूर फवारणी करावी, अशी मागणी नगरसेवक सारंग पुजारी यांनी केली आहे. यासंदर्भात नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्यास पालिका कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अंबाजोगाई शहरात गेल्या महिनाभरापासून डेंग्यू व चिकुनगुन्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. शहरातील प्रशांतनगर, सदाबहार कॉलनी, जुन्या गावात भटगल्ली, जिरे गल्ली, कुत्तरविहीर, बलुतीचा मळा, देशपांडे गल्ली, खतीब गल्ली, बाराभाई गल्ली अशा विविध भागांमध्ये घाणीमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागात आरोग्य जागृतीला वेग आला आहे. मात्र, कोरोनाबाबत व्यापक मोहीम सुरू असताना डासांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने शहरात ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती वाढली आहे, त्या भागात धूर फवारणी करून डासांचा बंदोबस्त करावा. त्यामुळे डेंग्यूसह मलेरिया, थंडी-ताप व इतर आजारांना आळा बसेल.
अंबाजोगाई शहरात गेल्या मार्च महिन्यात धूर फवारणी करण्यात आली. त्यानंतर मागणी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी अनेक भागात थंडी, तापाची साथ निर्माण झाली होती. यासाठी शहरात धूर फवारणी आवश्यक आहे. शहरातील अनेक मोठमोठ्या नाल्यांवर झाकण नसल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. हा डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी नगरसेवक सारंग पुजारी यांनी केली आहे.
......
अंबाजोगाईमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. नगरपरिषद आरोग्य विभागाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही फवारणी होत नाही. फॉगिंग मशीन दुरुस्तीसाठी पाठवल्या आहेत, असे उत्तर मिळते. शहरात आबेटिंग सुद्धा केली नाही. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
- सारंग पुजारी, नगरसेवक, अंबाजोगाई.
....
अंबाजोगाई शहरात नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्यावतीने धूर फवारणी करण्यात येईल. फॉगिंग मशिनरीतील तांत्रिक बिघाडामुळे काही दिवस हे काम राहिले. मात्र येत्या दोन दिवसात फवारणीचे काम सुरू होईल.
- अशोक साबळे, मुख्याधिकारी, नगरपरिषद.