युद्धजन्य परिस्थितीत आमचे शिक्षण चालू, माझ्यासह अनेक भारतीय येथे सुखरुप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 22:10 IST2022-02-25T22:08:34+5:302022-02-25T22:10:59+5:30
'आम्ही आमचे शिक्षण पुर्ण करुनच परत येऊ, असा विश्वास परळीच्या मुलीने व्यक्त केला आहे.'

युद्धजन्य परिस्थितीत आमचे शिक्षण चालू, माझ्यासह अनेक भारतीय येथे सुखरुप
परळी -रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. कधी काय होईल हे सांगता येणे तसे अशक्यच आहे. परंतु आम्ही जिथे राहतो त्या रशियातील भागात सुदैवाने अद्याप युद्धाची ठिणगी पडलेली नाही. माझ्यासह अनेक भारतीय येथे सुखरुप आहेत. आम्ही आमचे शिक्षण पुर्ण करुनच निर्धाराने परत येऊ असा विश्वास मुळ परळीचे रहिवाशी असलेल्या व सध्या रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या भार्गवी गिरीष भातलवंडे या मुलीने व्यक्त केला आहे. शहरातील श्री बालाजी मंदिर ,गणेश पार येथे ती राहते.
परळी, औरंगाबाद, अहमदाबाद असा शैक्षणिक प्रवास करीत भार्गवी गिरीष भातलवंडे एमबीबीएसच्या शिक्षणासाठी थेट रशियात पोहचली आहे. रशिया येथील सिंफेरोपोल येथे क्रिमीयन फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या दुसर्या वर्षात शिकत आहे. सध्या रशिया युक्रेनवर जोरदार हल्ला करीत असून रशियामध्ये काय स्थिती आहे असे तिला आमच्या प्रतिनिधीने विचारले असता आम्ही सुरक्षीत आहोत असे तिने सांगीतले. रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला असून या युद्धाचे प्रत्युत्तर सिमेपर्यंतच मर्यादीत असल्याने आम्ही जिथे वास्तव्यास तिथे कोणताही धोका नसल्याचे भार्गवीने सांगीतले. अत्यंत धोकादायक व तितकीच विचीत्र परिस्थिती असली तरी आमची सुरक्षा सरकारकडून केली जात असल्याने आम्हाला काही धोका आहे असे वाटत नसल्याचे तिने सांगीतले.
युद्धजन्य परिस्थितीत अभ्यासावरचे लक्ष विचलीत होता कामा नये, असा आम्हाला प्रशासनाकडून सल्ला दिला गेल्याने तसेच आई आणि वडिलांनी आत्मविश्वासाने अभ्यास कर अशी सूचना केल्याने आपण वैद्यकीय शिक्षण पुर्ण करुनच भारतात म्हणजेच परळीला पोहचूत असे तिने सांगीतले. माझ्यासोबत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी असून आम्ही सुरक्षीत असल्याचे भार्गवीने सांगीतले.