इतर परीक्षा होऊ शकतात, मग एमपीएससी का नाही ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:13+5:302021-03-13T04:58:13+5:30
बीड : कोरोना संसर्ग वाढत असल्याचे कारण पुढे करत १४ मार्च रोजी होणारी एमपीएसी परीक्षा शासनाने पुढे ढकलण्याचा निर्णय ...

इतर परीक्षा होऊ शकतात, मग एमपीएससी का नाही ?
बीड : कोरोना संसर्ग वाढत असल्याचे कारण पुढे करत १४ मार्च रोजी होणारी एमपीएसी परीक्षा शासनाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सरकारच्या या निर्णयामुळे सरकारविरोधात राज्यभर विद्यार्थी आक्रमक झाले होते. बीडमध्ये देखील जिल्हाधिकारी कार्यालयसमोर या निर्णयाचा निषेध विद्यार्थ्यांनी नोंदवला आहे.
राज्यात कोरोना काळातच इतर काही विभागाच्या परीक्षा झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी राज्यभर परीक्षा झाली. मात्र, १४ तारखेला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे इतर विभागाच्या परीक्षा होऊ शकतात, तर एमपीएससीची का नाही, असा सवाल विद्यार्थ्यांमधून विचारला जात आहे. तर, राज्यातील नेत्यांच्या मोठ्या सभा होऊ शकतात, लग्न समारंभ व इतर कार्यक्रम थाटात व गर्दी करून पार पडतात, तर एमपीएससी परीक्षा का नाही. मागील वर्षात जवळपास चार वेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वीच्या परिस्थितीचा विचार करून परीक्षार्थींनी देखील संयमाची भूमिका घेतली होती. मात्र, राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमाला होत असलेली गर्दी व इतर विभागाच्या झालेल्या परीक्षा यामुळे परीक्षार्थी आक्रमक झाले असून, राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. ठरलेल्या तारखेलाच परीक्षा घ्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
परीक्षेचे हॉलतिकीट दिले गेले होते
राज्यसेवा पूर्व परीक्षा नियोजित तारखेनुसार १४ मार्च रोजी होणार होती. त्याची तयारीदेखील प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली होती. तसेच परीक्षार्थींना हॉलतिकीट देखील पाठविण्यात आलेले आहेत. मात्र, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे परीक्षार्थींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
ही परीक्षा रद्द होण्याची चौथी वेळ
मागील वर्षापासून राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची ही चौथी वेळ आहे. मागील वर्षात लॉकडाऊन आणि कोरोना संसर्ग यामुळे वेगवेगळ्या महिन्यांत तीन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात फरक असून, शासनाने वेळेनुसार परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.
इतर विभागांच्या परीक्षा झाल्या होत्या
आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी काही दिवसांपूर्वी परीक्षा झाल्या होत्या, तर इतर काही विभागांच्या देखील परीक्षा झालेल्या आहेत. तर, एमपीएससी परीक्षा देखील नियोजनानुसार झाली पाहिजे, अशी भावना परीक्षार्थींमधून व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया
१४ तारखेला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा त्याच दिवशी घेण्यात यावी, तर ११ एप्रिल रोजी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात यावी. वेळोवेळी परीक्षा पुढेे ढकलल्यामुळे परीक्षार्थींच्या मानसिक स्थितीवर देखील परिणाम होत आहे.
-आबासाहेब जगदाळे
वेळोवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. तसेच पैसा व वेळदेखील वाया जात आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन परीक्षा घ्याव्यात.
-त्रिशला पवार
एमपीएससीची परीक्षा चार वेळा रद्द केली आहे, दिवसरात्र अभ्यास केल्यानंतर शासनाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे ताण वाढला आहे. परीक्षा पुढे ढकलायची होती किंवा नियोजन नव्हते तर हॉलतिकीट वाटप करायचे नव्हते.
-सुदर्शन घुमरे
परीक्षेची पूर्ण तयारी केलेली असताना अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे हिरमोड झाला आहे. दीड वर्षापासून परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तेव्हापासून अभ्यास करून तयारी पूर्ण केली होती. मात्र, अद्याप देखील परीक्षेसंदर्भात अनिश्चितता आहे.
-श्रीकांत येडे
कोरोना काळातच आरोग्य, बँक व इतर विभागाच्या परीक्षा झाल्या आहेत. आम्ही पीपीई कीट घालून परीक्षा द्यायला तयार आहोत. शासनाने तयारी करून घ्यावी व परीक्षा १४ मार्च रोजीच घ्यावी.
-गणेश बांगर
शासनाने परीक्षेच्या वेळेचे पूर्व नियोजन करून परीक्षा वेळेत घेणे गरजेचे आहे. परीक्षार्थींची तयारी पूर्ण झालेली असताना असा निर्णय घेणे म्हणजे परीक्षार्थींचे नुकसान आहे. परीक्षा वेळेत झाल्या तर करिअरच्या दृष्टीने पुढचे नियोजन करता येते. मात्र, वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे.
- काजल गोरे
बीड - १३ केंद्र
परीक्षार्थी - ३९००