होमिओपॅथिक डॉक्टरांना आधुनिक उपचारांच्या परवानगी विरोधात आयएमएचा उद्या राज्यव्यापी संप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 20:08 IST2025-09-17T20:07:31+5:302025-09-17T20:08:44+5:30
महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर्स एक दिवसाचा संप करणार असून, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.

होमिओपॅथिक डॉक्टरांना आधुनिक उपचारांच्या परवानगी विरोधात आयएमएचा उद्या राज्यव्यापी संप
बीड: महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकामुळे 'इंडियन मेडिकल असोसिएशन' आक्रमक झाली आहे. 'सीसीएमपी' कोर्स उत्तीर्ण झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, ज्याच्या विरोधात १८ सप्टेंबर रोजी राज्यभरातील सर्व एमबीबीएस डॉक्टर लाक्षणिक संप पुकारणार आहेत.
आयएमएने या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, यामुळे आरोग्य सेवेच्या गुणवत्तेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. एमबीबीएस अभ्यासक्रम हा ५.५ वर्षांचा असून त्यात १९ विषयांचा सखोल अभ्यास, क्लिनिकल अनुभव आणि एक वर्षाची इंटर्नशिप असते. याउलट, सीसीएमपी हा केवळ एक वर्षाचा कोर्स असून, आठवड्यातून फक्त दोन दिवस शिकवला जातो. अशा अपूर्ण प्रशिक्षणाने आधुनिक वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये विकसित होऊ शकत नाहीत. बीड आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनंत मुळे आणि सचिव डॉ. अमोल गीते यांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर्स एक दिवसाचा संप करणार असून, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.
रुग्ण सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
अपूर्ण प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींकडून उपचार झाल्यास चुकीचे निदान, दुष्परिणाम, अँटीबायोटिक रेसिस्टन्स आणि रुग्णाच्या मृत्यूची शक्यता वाढू शकते, अशी भीती आयएमएने व्यक्त केली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि राज्य वैद्यकीय परिषदांच्या नियमांनुसार, आधुनिक औषधोपचाराचा परवाना फक्त एमबीबीएस आणि त्यानंतरच्या पात्रतेसाठी आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.