ऑनलाईन फ्रिज खरेदी पडली महागात; तरुणीच्या खात्यातून तीन लाखांची रक्कम लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 18:50 IST2022-04-20T18:49:47+5:302022-04-20T18:50:33+5:30
फ्रीजची ऑर्डर होल्डवर गेली असल्याची बतावणी करून केली फसवणूक

ऑनलाईन फ्रिज खरेदी पडली महागात; तरुणीच्या खात्यातून तीन लाखांची रक्कम लंपास
अंबाजोगाई (बीड ) : जिल्ह्यात ऑनलाईन फसवणूकीचे गुन्हे वाढतच चालले आहेत. नागरिकांना कॉल करून तर कधी मोबाईलवर लिंक पाठवून वेगवेगळे अमिष दाखवून त्यांच्या खात्यातील रकमा परस्पर लंपास केल्या जात आहेत. असाच एक प्रकार अंबाजोगाई शहरातील गाठाळ गल्ली खडकपुरा येथे घडला. सायबर भामट्याने ऑनलाईन ऑर्डर होल्डवर ठेवल्याची थाप मारून तरुणीच्या मोबाईलवर लिंक पाठवून तब्बल २ लाख ९९ हजार ९८६ रूपयांची रक्कम परस्पर काढून घेतली.
पोलिसांच्या माहितीनुसार, संपदा सुधीर देशपांडे (रा.गाठाळ गल्ली, खडकपुरा, अंबाजोगाई) यांच्या बाबतीत असा प्रकार घडला. त्या खासगी कंपनीत संगणक अभियंता आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी आणि भावाने मिळून अॅमेझॉन या इ-कॉमर्स साईटवरून फ्रीज खरेदी केला. डिलिव्हरीसाठी संपदा यांचा मोबाईल क्रमांक दिला. सदरील फ्रीजची डिलिव्हरी ११ एप्रिल रोजी होती. दरम्यान, ९ एप्रिल रोजी त्यांना एक कॉल आला. समोरून बोलत असलेल्या भामट्याने त्यांना ई-कार्ट लॉजिस्टीक्स या कंपनीकडून बोलत असून तुमची फ्रीजची ऑर्डर होल्डवर गेली असल्याची बतावणी केली.
फ्रीजची डिलिव्हरी मिळण्यासाठी त्याने एक लिंक पाठवून त्यावर पाच रुपये पाठविण्यास सांगितले. अन्यथा फ्रीज परत जाईल असेही बजावले. त्यामुळे संपदा यांनी त्याने सांगितलेली प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर तीन व्यवहारातून त्या भामट्याने संपदा यांच्या बँक खात्यातून एकूण २ लाख ९९ हजार ९८६ रूपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संपदा देशपांडे यांनी शहर ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली. त्यावरून अज्ञाताविरूध्द फसवणुक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ च्या कलमा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.