चोरट्यांच्या टोळीवर जमावाचा हल्ला; मारहाणीत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 15:58 IST2020-07-13T15:29:35+5:302020-07-13T15:58:06+5:30
आष्टी तालुक्यातील फत्तेवडगांव येथील घटना

चोरट्यांच्या टोळीवर जमावाचा हल्ला; मारहाणीत एकाचा मृत्यू
कडा : चोरीच्या उद्देशाने रात्री उशिरा गावात चारपाच लोक फिरत असताना गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांना पकडण्याच्या प्रयत्नात एकजण जमावाच्या हाती लागला. यावेळी मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना फत्तेवडगांव येथे रविवारी रात्री घडली. हाकिम उर्फ विशाल नारायण भोसले ( ३८,रा.वाहिरा) असे असे मृताचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील फत्तेवडगांव येथे चार ते पाच लोक रात्री चोरीच्या उद्देशाने येऊन पुलाखालील पाईपमध्ये दबा धरून बसले होते. याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यात एकजण जमावाच्या हाती लागला. यावेळी बेदम मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. कडा पोलिसांनी रात्री उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र सोमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस अधीक्षक विजय कबाडे , आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत, पोलीस निरीक्षक माधव सुर्यवंशी यांनी भेट दिली.