दिंद्रुड : सहा वर्षाच्या मुलीवर ६३ वर्षाच्या वयोवृद्धाने जिल्हा परिषद शाळेतील बाथरूममध्ये नेत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवार दुपारी दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडली. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मुलगी तिच्या बहिणीसोबत हातंपपावर पाणी भरण्यासाठी गेली होती. याचाच फायदा घेत जि. प. शाळेतील बाथरूममध्ये नेत या वृद्धाने अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. यावेळी अल्पवयीन मुलीने तेथून पळ काढला. याबाबत मुलीच्या आईने दिंद्रुड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत किसन थावरे असे आरोपीचे नाव असल्याचे म्हटले आहे.
दिंद्रुड पोलीस ठाण्यात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सपोनि प्रभा पुंडगे यांनी अल्पवयीन मुलगी व तिच्या आईचा जबाब नोंदविला. याप्रकरणी भादंवि ३५४,३५४ ए, बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम- २०१२ नुसार व कलम ८,१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी किसन थावरे यास अटक केली असून तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे करत आहेत. रविवारी घडलेल्या घटनेचा बुधवारी दिंद्रुड पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याबाबत पंचक्रोशीत संताप व्यक्त होत आहे.
चौकट
गंभीर घटना घडल्यानंतर चार दिवसांनी गुन्हा दाखल होण्यामागे संबंधित गावाला असलेले ठाणे अमंलदार जबाबदार आहेत. मुलीचे आई-वडील दोनवेळा पोलीस ठाण्यात येऊनही गुन्हा दाखल होण्यास उशीर करण्यात आला. विशेष म्हणजे, दिंद्रुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गव्हाणकर हे कितीही महत्त्वाचे व गंभीर प्रसंग असताना फोन उचलत नाहीत. त्यामुळे याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून संबंधित ठाणे अंमलदाराला निलंबित करावे, अशी मागणी माजलगावच्या सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी केली आहे.