बीड जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीची अधिकृत घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 00:01 IST2020-01-13T23:59:44+5:302020-01-14T00:01:01+5:30
बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या ४ जानेवारी २०२० रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आजच (दि.१३) जाहीर करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी (बीड) प्रवीण धरमकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्टÑवादी काँग्रेसच्या शिवकन्या सिरसाट व उपाध्यक्षपदी देखील राष्टÑवादी काँग्रेसचेच बजरंग सोनवणे यांची निवड झाल्याचे अधिकृत जाहीर केले.

बीड जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीची अधिकृत घोषणा
बीड : बीडजिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या ४ जानेवारी २०२० रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आजच (दि.१३) जाहीर करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी (दि.१३) दिला. पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी (बीड) प्रवीण धरमकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्टÑवादी काँग्रेसच्या शिवकन्या सिरसाट व उपाध्यक्षपदी देखील राष्टÑवादी काँग्रेसचेच बजरंग सोनवणे यांची निवड झाल्याचे अधिकृत जाहीर केले.
खंडपीठाने यापूर्वी २ जानेवारी रोजी वरील निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे; परंतु याचा निकाल १३ जानेवारी २०२० पर्यंत जाहीर करू नये, असा आदेश दिला होता. दरम्यान झालेल्या निवडणुकीत विजयी उमेदवाराला ३२ आणि पराभूत उमेदवाराला २१ मते मिळाल्याचे आज खंडपीठात सादर करण्यात आलेल्या सीलबंद निकालपत्रावरुन स्पष्ट झाले. विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये ११ मतांचा फरक असल्यामुळे अपात्र ठरविलेल्या उमेदवारांच्या मतांचा निकालावर परिणाम झाला नसल्यामुळे खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना वरीलप्रमाणे आदेश दिला होता.
राजकीय घडामोडी : अकरा मतांचा फरक
अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान झाल्यामुळे कुणाला किती मते पडली हे समजल्यामुळे निकाल कळाला असला तरी अधिकृत घोषणा बाकी होती. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारांना अपक्ष एक, भाजपचे तीन, शिवसेनेचे चार, कॉँग्रेसचे दोन अशा दहा सदस्यांनी मतदान केल्याने ३२ विरुद्ध २१ मतांनी अध्यक्षपदासाठी शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे हे निवडून आले.
१३ जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करु नये असे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेले असल्याने अधिकृत निकाल जाहीर सोमवारी जाहीर केला. बीड जिल्हा परिषदेचा निकाल सीलबंद लखोट्यात कोषागारमध्ये सुरक्षित ठेवला होता. हा लखोटा आज सोमवारी खंडपीठासमोर उघडण्यात आला. अध्यक्षपदासाठी शिवकन्या सिरसाट यांनी भाजपाच्या उमेदवार डॉ.योगिनी थोरात यांचा तर उपाध्यक्षपदासाठी बजरंग सोनवणे यांनी भाजपाचे भारत काळे यांचा ३२ विरुद्ध २१ मतांनी पराभव केला.