लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : शासनाच्या बदली धोरणाच्या विरोधात परिचारिकांनी मंगळवारी सकाळी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने केली. यावेळी शासनाच्या धोरणाचा परिचारिकांनी निषेध नोंदविला.
बदलीचे अधिनियम २००५ च्या अधीन राहून परिचारिकांच्या बदल्या करण्याचे संचालनालयाच्या विचाराधीन आहे. या बदल्या परिचारिका संवर्गासाठी अन्यायकारक असल्याचे परिचारिकांच्यावतीने सांगण्यात येत आहे. परिचारिकांच्या रुग्णालयाच्या अंतर्गत विभागीय म्हणजे एका कक्षातून दुसऱ्या कक्षात बदल्या नियमितपणे केल्या जातात. जिथे अशा विभागीय बदल्या होत नसतील तेथे अंतर्गत बदल्यांचे धोरण सक्तीने राबवावे. जेणेकरून इतरत्र होणाऱ्या बदल्यांनी कौटुंबिक त्रास, मुलांचे शिक्षण, वयस्कर सासू, सासरे, आई, वडिलांचे संगोपन व कुंटुब विस्कळीत होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
परिचारिकांचे पद हे सेवेचे पद असून कोणतेच आर्थिक व्यवहार या पदाच्या माध्यमातून होत नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी बनवलेला बदली नियम २००५ मधून परिचारिकांना वगळण्यात यावे. कोरोना महामारी अजून संपलेली नसून तिसरी लाट (डेल्टा प्लस) येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या महामारीत प्रामाणिकपणे रुग्णसेवेचे काम करणाऱ्या परिचारिकांच्या अशा बदल्या केल्यास या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहणाऱ्या परिचारिकांचे मानसिक खच्चीकरण होईल. याकरीता शासनाने परिचारिकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा. परिचारिका संघटनेला विचारात घेतल्याशिवाय कोणतीही बदली करू नये. या व विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयासमोर परिचारिकांनी काळ्या फिती लावून निदर्शने करून निषेध नोंदविला. न्याय न मिळाल्यास संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिचारिकांच्यावतीने देण्यात आला.
....
मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन
परिचारिकांच्या सुरू असलेल्या आंदोलनास स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी भेट दिली. त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.