आता रक्त पिशव्यांचा तुटवडा; कसा होणार डेंग्यू रुग्णांवर उपचार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:10+5:302021-08-28T04:37:10+5:30
अविनाश मुडेगावकर/ लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोनामुळे ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या शासकीय रक्तपेढ्यांना आता ...

आता रक्त पिशव्यांचा तुटवडा; कसा होणार डेंग्यू रुग्णांवर उपचार?
अविनाश मुडेगावकर/
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : कोरोनामुळे ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या शासकीय रक्तपेढ्यांना आता रक्त पिशव्यांच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे. सध्या डेंग्यूमुळे व दैनंदिन शस्त्रक्रियांमुळे रक्तपेढीत दररोज २० ते २५ बॅगांची मागणी होत आहे. याशिवाय प्लेटलेट्सची मागणीही वाढली आहे. मात्र, बॅगांचीच कमतरता जाणवत असल्याने प्लेटलेट्स द्यायच्या कशा? असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील रुग्ण अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी येतात. सध्या विविध ठिकाणी डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजारावर अँटिबायोटिक किंवा अँटिव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. डेंग्यूच्या गंभीर रुग्णांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याचा धोका असतो. जेव्हा प्लेटलेट्स काउंट १५ हजार प्रतिमायक्रोलिटरपेक्षाखाली येतात तेव्हा त्याला लो प्लेटलेट्स’मानले जाते. अशावेळी रुग्णाला रँडम डोनर प्लेटलेट्स किंवा सिंगल डोनर प्लेटलेट्स दिले जाते; परंतु कोरोनामुळे रक्तदानाची मोहीम थंडावल्याने प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी प्लेटलेट्ससाठी सामान्य रुग्णांच्या नातेवाइकांना लातूर येथील खाजगी रक्तपेढीमधून चढ्या दरात पदरमोड करून खासगी रक्तपेढीतून प्लेटलेट्स आणण्याची वेळ आली आहे.
...
ट्रिपल बॅगच्या मागणीत वाढ
एका रक्तदात्याचा रक्तातून लाल पेशी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा अशा तीन घटकांना वेगळे करता येते. यासाठी ट्रिपल बॅगची गरज पडते. सूत्रानुसार कोरोनामुळे या बॅगच्या उत्पादनावर प्रभाव पडला आहे. कोरोना कमी होताच रक्त व रक्त घटकांच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठादारांकडून कमी पुरवठा होत असल्याची माहिती आहे.
...
मागणीप्रमाणे पुरवठा बंद
स्वाराती शासकीय रुग्णालयांच्या रक्तपेढीत कोरोनापूर्वी रक्तदात्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत नव्हता. सातत्याने रक्तदान शिबिर सुरूच असते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व लसीकरण यामुळे रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे. रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान करण्यासाठी जनजागृती सुरू आहे. रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे आले तर निश्चितच तुटवडा कमी होऊन गरजू रुग्णांना रक्तपुरवठा होईल.
-डॉ. शीला गायकवाड, रक्तपेढी, अंबाजोगाई.