परळीचे महादेव मुंडेच काय, पण बीडमधील या चार खुनांचा पोलिसांना होईना उलगडा?
By सोमनाथ खताळ | Updated: February 4, 2025 12:14 IST2025-02-04T12:12:20+5:302025-02-04T12:14:06+5:30
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील गंभीर गुन्हे चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.

परळीचे महादेव मुंडेच काय, पण बीडमधील या चार खुनांचा पोलिसांना होईना उलगडा?
बीड : २०२३ मध्ये जिल्ह्यात ६४ जणांची हत्या झाली. यातील ६० गुन्हे उघड झाले, परंतु अद्यापही चार गुन्हे उघड झालेले नाहीत. सध्या तरी परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचीच चर्चा सुरू असून, इतर तीन खुनांबाबत कोणीही ब्र शब्द काढत नाही. पोलिसांनाही हे गुन्हे उघड करून मारेकरी कोण? याचा तपास लावण्यात अपयश आले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून जिल्ह्यातील गंभीर गुन्हे चव्हाट्यावर येऊ लागले. २०२३ मध्ये ६४ खुनांचे गुन्हे दाखल झाले होते. २०२४ मध्ये यात घट होऊन तो आकडा ४० वर आला. हे सर्व गुन्हे उघड करण्यातही बीड पोलिसांना यश आले, परंतु २०२३ मधील गुन्ह्यांना दोन वर्षे उलटले, तरी अद्यापही त्यातील मारेकरी शोधण्यात बीड पोलिस यशस्वी झालेले नाहीत. सध्या परळीतील महादेव मुंडे या खून प्रकरणाची राज्यभर चर्चा होत आहे. भाजपचे आ. सुरेश धस यांनी यात अनेक गंभीर आरोपही केले. त्यामुळे याचा तपास अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी चाेरमले यांच्याकडे देण्यात आला, परंतु इतर तीन गुन्हे अद्यापही उघड झालेले नाहीत. त्यांच्या तपासाचे आणि मारेकऱ्यांचे काय?, त्यांच्याबाबत कोणीही ब्र शब्द काढत नाही. पोलिसांकडून हे प्रकरण कायम तपासावर ठेवून याची फाइल जवळपास बंद केली आहे. त्यामुळे नेकनूर, अंभोरा आणि बर्दापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अजूनही मोकाटच आहेत.
२०२१, २०२२ मधील खूनही अनडिटेक्ट
२०२१ साली माजलगाव शहर (एफआयर क्रमांक - ३८९/२०२१) आणि २०२२ साली अंबाजोगाई ग्रामीण (एफआयर क्रमांक - ४४/२०२२) पोलिस ठाण्यातील खुनाचे गुन्हे उघड झालेले नाहीत. चाेरी, घरफोडी या गुन्ह्यांच्या तपासाचा टक्काही असमाधानकारक आहे. त्यात खुनाचे गुन्हेही उघड होत नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांकडून मात्र योग्य तपास झाल्यासचा दावा करत ‘अ फायनल’, म्हणजेच कायम तपासावर असल्याचे सांगत दुर्लक्ष केले जात आहे.
प्रकरण १
पोलिस ठाणे - बर्दापूर
एफआयर क्रमांक - २०/२०२३
दिनांक - १२ फेब्रुवारी २०२३
हकीकत
अंबाजोगाई तालुक्यातील बाभळगाव येथील काशिनाथ बारीकराव उजगरे (वय ६०) यांचा ८ ते ११ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान अज्ञात व्यक्तीने कशानेतरी गळा आवळून खून केला होता. पत्नी पंचशिला उजगरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.
प्रकरण २
पोलिस ठाणे - अंभोरा
एफआयर क्रमांक - २३/२०२३
दिनांक - १९ फेब्रुवारी २०२३
हकीकत
आष्टी तालुक्यातील वेलतुरी शिवारात १६ फेब्रुवारी २०२३ रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता, त्याला गळा आवळून मारल्याने नाक, तोंडातून रक्त आले होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला, परंतु त्याची ओळख पटली नाही. मृतदेह ओळखण्यातच अपयश आल्याने मारेकरी अद्यापही मोकाटच आहे. हवालदार लुईस पवार यांनी या प्रकरणात फिर्याद दिलेली आहे.
प्रकरण ३
पोलिस ठाणे - नेकनूर
एफआयर क्रमांक - १२७/२०२३
दिनांक - २४ मे २०२३
हकिकत
बीड तालुक्यातील कवलीवस्ती मुळूकवाडी येथील गोरख ढास यांचा मृतदेह २६ मे २०२३ रोजी घरामागील नांगरटीत आढळून आला होता. त्यांच्या डोक्यात दगड मारून खून करण्यात आला होता. शिवाय बाजूला मेलेली काेंबडी आणि एक पिशवीही आढळली होती. पत्नी रूक्मिनबाई ढास यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. याचा तपासही अद्याप लागलेला नाही.
प्रकरण ४
पोलिस ठाणे - परळी शहर
एफआयर क्रमांक - १९१/२०२३
दिनांक - २२ ऑक्टोबर २०२३
हकिकत
परळी शहरातील बँक कॉलनी भागातील महादेव मुंडे (वय ३८) यांचा २१ ऑक्टोबर २०२३ रोजी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. याप्रकरणी अशोक मुंडे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. अद्यापही यातील मारेकरी शोधलेले नाहीत.