आईच्या मृतदेहावर चिमुकल्याने काढली रात्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 06:02 IST2018-07-16T06:01:51+5:302018-07-16T06:02:10+5:30
छत्तीसगडहून महाराष्ट्रात मजुरीसाठी आलेल्या तरुणाने पत्नीचा गळा दाबून खून केला.

आईच्या मृतदेहावर चिमुकल्याने काढली रात्र
आष्टी/कडा (जि. बीड) : छत्तीसगडहून महाराष्ट्रात मजुरीसाठी आलेल्या तरुणाने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यांचा दोन वर्षांचा चिमुकला आईच्या मृतदेहावर पडून रडला अन् तसाच झोपी गेला. सकाळी आई उठत नसल्याने तो पुन्हा रडू लागला. त्याच्या आवाजाने महिलेचा मृत्यू झाल्याचे शेजारील लोकांच्या लक्षात आले.
आष्टी तालुक्यातील धानोरा येथे ही हृदयद्रावक घटना घडली. बिमला सतनामी असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती विनोद फरार झाला आहे. मजुरीच्या शोधात सतनामी दांपत्य चिमुकल्यासह धानोऱ्यात आले होते. विनोद हा बांधकामावर मजुरी करत होता. शनिवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला. विनोदने पत्नीचा गळा आवळून खून केला. बाजूलाच असलेला चिमुकला रडतच आईच्या पोटावर झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याने आईला उठविण्याचा प्रयत्न केला असावा. पण, ती उठत नसल्याचे पाहून तो पुन्हा रडू लागला. त्याचा आवाज ऐकून शेजारचे लोक त्यांच्या घराकडे धावले.
रडून रडून चिमुकल्याचा घसा कोरडा पडला होता. सकाळी हा सर्व प्रकार ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर त्यांचे डोळे पाणावले, महिलांना अश्रू अनावर झाले होते.