व्यावसायिक सिलिंडरची दरवाढ झाल्याने हॉटेल्स चालकांसमोर नवीन संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:27+5:302021-07-18T04:24:27+5:30
भाववाढ करावी तर ग्राहक येईना अंबाजोगाई : कोरोना काळात दीड वर्षांत हॉटेल्स व चहाच्या टपऱ्या जवळपास आठ महिने ...

व्यावसायिक सिलिंडरची दरवाढ झाल्याने हॉटेल्स चालकांसमोर नवीन संकट
भाववाढ करावी तर ग्राहक येईना
अंबाजोगाई : कोरोना काळात दीड वर्षांत हॉटेल्स व चहाच्या टपऱ्या जवळपास आठ महिने बंद राहिल्याने आणि कच्चा माल व व्यावसायिक सिलिंडरचे दर तब्बल ४३० रुपयांनी वाढल्याने हॉटेल्सचा व्यवसाय करणाऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे.
गेल्या वर्षीपासून या व्यवसायाची बिघडलेली स्थिती अजूनही सुधारलेली नाही. यावर्षीही मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने बहुतांश दिवस हॉटेल्स व्यवसाय बंद राहिले, तर आता वेळेच्या मर्यादेमुळे ग्राहकांची संख्या घटली आहे. लोक हॉटेल्स आणि स्वीटहोममधील पदार्थांची खरेदी करणे टाळत आहेत. याशिवाय माल तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने हॉटेल व्यवसाय केवळ नावापुरतेच चालवावे लागत आहेत. आता नाश्ता आणि हॉटेलमध्ये जेवण महाग झाले आहे. त्यातच हॉटेलचालकांना लागणाऱ्या व्यावसायिक १९ किलोचे वापरात येणारे गॅस सिलिंडर वर्षभरात ४३० रुपयांनी वाढले आहे. महागाई वाढल्याने कर्मचारी पगारवाढीची मागणी करीत आहेत. याशिवाय विजेचे दर, विविध कर, पाण्यावर होत असलेला खर्च, आदींची वाढ झाली आहे. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर हॉटेल व्यवसाय सुरू आहेत. कधी कधी पदार्थ उरल्यास तोटाही सहन करावा लागतो. सध्या सण नसल्याने मिठाईला मागणी कमीच आहे. या सर्व कारणामुळे हा व्यवसाय चालवावा की नाही, अशी गंभीर समस्या भेडसावू लागली आहे.
भाववाढ केली तर ग्राहक येईना
भाज्या, खाद्यतेल आणि डिझेल वाढल्याने सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशा महागाईत मालाच्या किमती वाढविणे हाच एक पर्याय आहे. मात्र, भाववाढ केल्यास ग्राहक येणार नाहीत अशी स्थिती होऊ नये. त्यामुळे पदार्थाच्या किमती वाढविता येत नाहीत.
पार्सल विक्रीही थंडावली
हॉटेल व्यवसाय दुपारी चार वाजता बंद झाल्यानंतर पार्सल विक्रीसाठी मुभा दिली गेली असली तरीही एकदा बाजारपेठ बंद झाल्यानंतर ग्राहकही पार्सलच्या मागणीसाठी फिरकत नाहीत. अनेकांची इच्छा हॉटेलमध्ये बसून खाण्याचीच असते. याचाही मोठा फटका या व्यवसायाला कारणीभूत ठरू लागला आहे.