पुन्हा हलगर्जी; प्रकृती गंभीर असतानाही स्वॅब घेऊन घरी पाठविलेल्या वृद्धाचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 17:19 IST2020-08-11T17:17:13+5:302020-08-11T17:19:58+5:30
आठवड्यापूर्वीच डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे एकाचा जीव गेल्याची तक्रार समोर आली होती. याप्रकाराने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पुन्हा हलगर्जी; प्रकृती गंभीर असतानाही स्वॅब घेऊन घरी पाठविलेल्या वृद्धाचा अंत
बीड : एका वृद्धाला आॅक्सिजनची आवश्यकता असताना आणि प्रकृती चिंताजनक असतानाही स्वॅब घेऊन घरी पाठविले. त्यानंतर अवघ्या काही तासांनी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला. ही घटना पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे रविवारी घडली. या निमित्ताने जिल्हा रुग्णालयातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आठवड्यापूर्वीच डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे एकाचा जीव गेल्याची तक्रार समोर आली होती. याप्रकाराने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
डोंगरकिन्हीपासून जवळच असलेल्या एका वस्तीवरील ७२ वर्षीय वृद्धास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ८ आॅगस्ट रोजी दुपारी प्राथमिक आरोग्य केंद्रात आला. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता आॅक्सिजन अवघा ४५ (किमान ९० पाहिजे) होता. तसेच त्याला कोरोनाची लक्षणे असल्याने रेफर लेटरवर स्पष्ट लिहून त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविले. सायंकाळच्या सुमारास त्या वृद्धाचा स्वॅब घेऊन त्याला घरी पाठविण्यात आले. रेफर लेटरवर स्पष्ट लिहिलेले असतानाही डॉक्टरांनी तपासणी न करताच त्याला घरी पाठविले. त्याला घरी पाठविले म्हणून नातेवाईकांनीही डोंगरकिन्हीच्या डॉक्टरांना कळविले नाही. रविवारी सायंकाळी त्याला पुन्हा त्रास सुरू झाला आणि रात्रीच्या सुमारास त्याचा घरीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. नंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
चौकशी करून दोषींवर कारवाई करावी
या प्रकरणात कोणत्या डॉक्टरची चूक आहे, हे प्रशासनाने ठरवावे. परंतु रुग्ण गंभीर असतानाही त्याला घरी पाठविले. त्यामुळे तो दगावला. यात आरोग्य विभागाची चूक आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
रुग्णवाहिका नसल्याने खाजगी वाहन
डोंगरकिन्ही आरोग्य केंद्रात कोरोना संशयित रुग्णाला हलवण्यास स्वतंत्र रुग्णवाहिका नाही. १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्या रुग्णाला खाजगी वाहनातून बीडला आणले. रुग्णवाहिका संख्या वाढविण्याची गरज आहे.
आरोग्य केंद्रात आल्यावर त्याची तपासणी करून रेफर केले. जिल्हा रुग्णालयातून स्वॅब घेऊन त्याला घरी पाठविले. रविवारी त्याचा मृत्यू झाल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. या सर्व प्रकाराबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना बोललो आहे.
- डॉ.एल.आर.तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी, पाटोदा
रुग्ण कधी आला व कोणी तपासला, त्याला घरी का पाठविले, याबाबत सर्व माहिती घेऊन तुम्हाला कळवितो.
- डॉ.सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक बीड