राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीडचा विकास बारामतीसारखा का केला नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:27 IST2018-10-02T00:27:09+5:302018-10-02T00:27:49+5:30
मला विरोध करण्यासाठीच देश पातळीवरच्या नेत्याला बीडमध्ये मुक्कामास बोलावले आहे; परंतु अशी कितीही वादळे आली तरी मी घाबरत नाही. इतकी वर्षे सत्ता असून सुध्दा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीडचा विकास बारामतीसारखा का केला नाही, असा सवाल करून या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आता इथल्या जनतेला बारामतीच्या नेत्याची गरज नाही. त्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे सांगून राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकीत स्वत:चा उमेदवार पाडण्यासाठीच उमेदवार शोधत असल्याची खरमरीत टीका केली.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीडचा विकास बारामतीसारखा का केला नाही?
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : मला विरोध करण्यासाठीच देश पातळीवरच्या नेत्याला बीडमध्ये मुक्कामास बोलावले आहे; परंतु अशी कितीही वादळे आली तरी मी घाबरत नाही. इतकी वर्षे सत्ता असून सुध्दा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीडचा विकास बारामतीसारखा का केला नाही, असा सवाल करून या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आता इथल्या जनतेला बारामतीच्या नेत्याची गरज नाही. त्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे सांगून राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकीत स्वत:चा उमेदवार पाडण्यासाठीच उमेदवार शोधत असल्याची खरमरीत टीका केली.
भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश आडसकर यांच्या चौंडी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. आर. टी. देशमुख, आ. सुरेश धस, माजी आ. केशवराव आंधळे, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे आदींसह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.
एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी मेळावा घेण्यासाठी देश पातळीवरच्या नेत्याला मुक्कामाला बोलावणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे दुर्दैव आहे. यामागे मला विरोध करणे हाच एकमेव उद्देश आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या. आम्ही राष्ट्रीय नेत्याला न बोलावता जनतेला सोबत घेऊन राजकारण करतो. ज्या जिल्ह्याच्या मातीत लोकनेते मुंडेसाहेबांचा जन्म झाला, त्याच मातीत ते विलीन झाले. त्यांच्यावर अलोट प्रेम करणा-या इथल्या सर्व सामान्य, गोरगरीब जनतेची आम्ही समर्थपणे सेवा करत आहोत. त्यासाठी बारामतीच्या नेत्याची आम्हाला गरज नाही. मग ते दहा हजार कोटीचे महामार्ग असो, रेल्वे असो, की जलसंधारणाची कामे असोत. मागच्या पन्नास वर्षात कधीही झाला नाही असा विकास आम्ही चार चार वर्षात केल्याचे त्या म्हणाल्या.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार शोधत आहेत. स्वत:चा उमेदवार पाडण्यासाठी त्यांची ही शोध मोहीम चालू आहे. आजचा मेळावा हा त्यासाठीच आहे; परंतु कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा पराभव अटळ असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
मोठ्याप्रमाणे छोटा हाबाडा कणखर - प्रीतम मुंडे
खा.प्रीतम मुंडे यांनी बोलताना स्व. बाबुराव आडसकर हे दुरदृष्टी असणारे नेते होते, असे सांगून मोठ्या हाबाडाएवढाच छोटा हाबाडा कणखर असल्याचे सांगितले. पंकजा मुंडे यांना बोलावले म्हणजे आपला राजकीय प्रवास, गावाचा प्रवासाचा रस्ता सुखकर होतो, असे त्या म्हणाल्या. कार्यक्र मास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रास्ताविक संस्थेचे सचिव रमेश आडसकर यांनी केले.