तीन वेळा विवाह अन् १२७ मुलांचे ‘माय-बाप’; बीडच्या प्रीती व संतोष गर्जे यांची 'लव्ह स्टोरी'
By सोमनाथ खताळ | Updated: February 14, 2025 16:29 IST2025-02-14T16:26:23+5:302025-02-14T16:29:02+5:30
व्हॅलेंटाइन डे स्पेशल: चित्रपटातील कथेला लाजवेल, अशी ही यशोगाथा आहे.

तीन वेळा विवाह अन् १२७ मुलांचे ‘माय-बाप’; बीडच्या प्रीती व संतोष गर्जे यांची 'लव्ह स्टोरी'
बीड : सामाजिक काम करताना नातेवाइकांच्या मनाचाही विचार करावा लागतो. त्यामुळे एकाच जोडप्याने स्वत:साठी, आई आणि सासू-सासऱ्यांसाठी तीनवेळा विवाह केला. प्रीती व संतोष गर्जे असे या लव्ह बर्ड्सचे नाव असून, ते आज ‘सहारा’ (गेवराई, जि. बीड) अनाथालयातील १२७ मुलांचे माय - बाप म्हणून काम करतात. चित्रपटातील स्टोरीला लाजवेल, अशी ही यशोगाथा आहे.
संतोष १२ वी पास, तर प्रीती यांनी विधिची पदवी घेतली आहे. २०११ साली संतोष हे यवतमाळ येथे 'चलो युवा कुछ कर दिखाओ' या शिबिरात मार्गदर्शनासाठी गेले. तेथे प्रश्नोत्तर झाले. त्यानंतर एकमेकांचे संपर्क क्रमांक ‘शेअर’केले. ‘फ्रेंडशिप डे’ला प्रीतीचा पहिला मेसेज आला. सुरुवातीला मेसेज आणि नंतर कॉलवर बोलू लागले. संस्थेची माहिती आणि इतर हालचाली विचारू लागले. बोलताना ‘स्वभाव’ आवडला. संतोष यांना आपण करत असलेल्या कामासाठी ‘जोडीदार’ म्हणून प्रीती योग्य असल्याचा विश्वास बसला. त्यामुळे प्रीतीला सहारा अनाथालयात बोलावले. १० नोव्हेंबर २०११ रोजी त्या गेवराईला आल्या. सर्व पाहणी करून ते बांधावर गप्पा मारत होते. सूर्य मावळतीला जात असतानाच संतोष यांनी प्रीतीला ‘प्रपोझ’ केले. तेवढ्यावरच न थांबता उद्याच लग्न करू असा प्रस्तावही ठेवला. त्याप्रमाणे ११-११-२०११ या दिवशी दुपारी ११:११ मिनिटांचा मुहूर्त ठरला. आदल्या दिवशी सराफाकडून १ ग्रॅमचे मंगळसूत्र घेतले आणि ठरल्याप्रमाणे विवाह झाला.
कसे झाले तीन लग्न?
११ नाेव्हेंबर २०११ साली प्रीती व संतोष हे दोघेच कपिलधार येथे गेले. एका झाडाखाली थांबून एकमेकांचा स्वीकार केला. त्यानंतर प्रीती परत यवतमाळला गेल्या. तीन महिने राहिल्या. फेब्रुवारीला परत आल्या. सोबत त्यांचे आई-वडील होते. त्यांनी संतोष यांचे काम पाहिले. तेव्हा ते ३५ मुलांचा सांभाळ करत होते. हे पाहून नोंदणी पद्धतीने २५० रुपयांत दुसरा विवाह झाला. याची बातमी झाल्यावर संतोष यांच्या आईला समजले. त्या रडत आल्या. नातेवाइक काय म्हणतील, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या समाधानासाठी १८ मार्च २०१२ ला पुन्हा तिसरे लग्न केले. तेव्हा २०० वऱ्हाडी होते.
१२७ मुलांना ‘सहारा’
संतोष यांच्या बहिणीचा दुसऱ्या बाळंतपणात मृत्यू झाला. पहिल्या मुलीचा मेहुण्याने सांभाळ न केल्याने तिचे हाल पाहवले नाहीत. त्यामुळे २०२४ साली ‘सहारा’ अनाथालाय सुरू केले. सध्या येथे ४७ मुलींसह एकूण १२७ मुले आहेत. त्यांचा सांभाळ आई-वडील बनून प्रीती व संतोष गर्जे करतात. संतोष यांच्या पोटच्या स्वरा व ओवी या दोन मुलीही याच मुलांमध्ये असतात.