बांधाच्या वादातून १५ वर्षांच्या मुलाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:40+5:302021-08-12T04:37:40+5:30
गेवराई : बांधाच्या वादातून १५ वर्षीय मुलाचा खून करून प्रेत उसाच्या शेतात फेकले. ही खळबळजनक घटना शनिवारी (दि. ७) ...

बांधाच्या वादातून १५ वर्षांच्या मुलाचा खून
गेवराई : बांधाच्या वादातून १५ वर्षीय मुलाचा खून करून प्रेत उसाच्या शेतात फेकले. ही खळबळजनक घटना शनिवारी (दि. ७) घडली. या प्रकरणी ९ ऑगस्ट रोजी पाचजणांवर खुनाचा गुन्हा नोंंद झाला असून, मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
संदीप सोपान चव्हाण (वय १५, रा. भेंडटाकळी तांडा, ता. गेवराई) असे मृताचे नाव आहे. सोपान चव्हाण व किशोर लोंढे यांचे शेजारी शेत आहे. त्यांच्यात बांधावरून सतत वाद सुरू होते. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शेतातून संदीप चव्हाण हा बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला तेव्हा तो शेजारील किशोर लोंढे याच्या शेतात मृतावस्थेत आढळला. सहायक निरीक्षक प्रताप नवघरे व सहकाऱ्यांनी धाव घेतली. दरम्यान, संदीपच्या कुटुंबीयांनी त्याची शेजाऱ्यांनी बांधाच्या वादातून हत्या करून प्रेत फेकून दिल्याची तक्रार दिली. त्यावरून ९ ऑगस्ट रोजी रात्री तलवाडा ठाण्यात किशोर विठ्ठल लोंढे, भगवान विठ्ठल लोंढे, बाळू बळिराम लोंढे, सोमनाथ भगवान लोंढे, आकाश भगवान लाेंढे (सर्व रा. भेंडटाकळी) यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. उपनिरीक्षक सुभाष माने तपास करीत आहेत.
....
शवविच्छेदन अहवालात विजेच्या धक्क्याचे कारण
दरम्यान, मृत संदीप चव्हाणच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. यामध्ये त्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे नमूद केले आहे. त्याचा खून कसा केला, याचा उल्लेखही तक्रारीत नमूद नाही. त्यामुळे नेमके काय घडले, हे तपासात समोर येईल, असे उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांनी सांगितले.
....
तीन दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर विठ्ठल लोंढे यास १० ऑगस्ट रोजी तलवाडा पोलिसांनी अटक केली. किशोरला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
......