नगरपालिकेचा माजलगावकरांच्या आरोग्याशी खेळ; दोन वर्षांपासून दुषित पाण्याच्या पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 02:22 PM2020-09-09T14:22:20+5:302020-09-09T14:37:50+5:30

पाण्यात वापरण्यात येणाऱ्या तुरटीवर धुळीचे थर, पाल, उंदराच्या लेंड्याचा ढिग

Municipal game with the health of Majalgaonkars; Contaminated water supply has been threatening the health of citizens for the last two years | नगरपालिकेचा माजलगावकरांच्या आरोग्याशी खेळ; दोन वर्षांपासून दुषित पाण्याच्या पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नगरपालिकेचा माजलगावकरांच्या आरोग्याशी खेळ; दोन वर्षांपासून दुषित पाण्याच्या पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next
ठळक मुद्देजलशुद्धीकरण केंद्रातूनच दुषित पाण्याचा पुरवठादोन वर्षांपासून माजलगावातील जलशुद्धीकरण केंद्र बंद

- पुरूषोत्तम करवा 

माजलगाव : जलशुद्धीकरण केंद्र दोन वर्षापासून बंद असल्याने शहरासह परिसरातील ११ खेड्यांना दुषित, शेवाळयुक्त, हिरवेगार पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सद्यस्थितीत कोरोना महामारीमुळे भयभीत झालेले नागरीक आरोग्याची काळजी घेत असताना पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुषित पाणी प्यावे लागतेय. अनेक वर्षापासून बंद असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुरटीवर धुळीचा थर चढला असून, त्यावर पाल, उंदराच्या लेंड्या साचलेल्या असून तीच तुरटी पिण्याच्या पाण्यात वापरून जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचा प्रकार पालिका कर्मचाऱ्यांकडून होतोय. 

माजलगाव धरणाच्या बाजुलाच माजलगाव शहर व आजुबाजुच्या 11 खेडयाला पाणी पुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मागील एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून हे जलशुद्धीकरण केंद्र नादुरुस्त असल्याने पाणी शुद्ध न करताच त्याचा पुरवठा करण्यात येत आहे. शहरासह इतर ११ गावांना थेट धरणातून येणारे पाणी नळाद्वारे देण्यात येत आहे. त्यात आता पावसाळा असल्याने माजलगाव धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे मोठयाप्रमाणावर गाळ येत असल्यामुळे व जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याने पाणी शुध्द न करताच नळाद्वारे सोडण्यात येत आहे. यामुळे नळाद्वारे अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. 

जलशुद्धीकरण बंद असल्याने हे पाणी शुद्ध न करताच नळाद्वारे सोडल्याने नागरिकांना दूषित, हिरवेगार, गढुळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. मूळ जलशुद्धीकरण केंद्र नादुरुस्त असून सध्या केवेळ पाण्यात तुरटी वापरण्यात येते तीही अत्यंत दुषित आहे. सदर ठिकाणी ठेवण्यात आलेली तुरटीवर धुळीचा थर साचलेला असून त्यावर पाल, उंदराच्या लेंड्या पडलेल्या आहेत. हिच तुरटी जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्यात टाकण्यात येत असल्याने शहरासह ११ खेड्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वेळा अळ्या देखील पाण्यात निघत आहेत तर या पाण्याची दुर्गंधी  येत असल्याने नागरिक हया पाण्याचा केवळ सांडपाण्यासाढीच उपयोग करतांना दिसत आहेत. 

ज्याची परिस्थिती आहे तोच विकतचे पाणी घेत असून ज्यांची परिस्थिती नाही अशा लोकांना मात्र हे दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. परिणामी शहरासह परिसरातील नागरिक कोरोनासह जलजन्य आजाराने त्रस्त असून अनेकांना ताप, सर्दी, कावीळ, जुलाब सारखे आजार होत आहेत. त्यात कोरोना झाला की काय अशी भिती निर्माण होत आहे. ग्रामीण व खाजगी रुग्णालयात या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. साथ रोगाचे थैमान चालू असताना देखील नगरपालिका प्रशासनाला जाग येत नसल्याने  संताप व्यक्त केला जात आहे. 

ब्लिचिंग पावडरचे पोते पडून 
माजलगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्र बंद असताना ब्लिचिंग पावडर टाकणे गरजेचे आहे. परंतु ब्लिचिंग पावडर असतांना ते टाकले जात नसल्याने दूषित पाण्यातून नागरिकांच्या आरोग्याशी पालिकेने खेळ चालवला आहे. कोणी एखाद्या वरिष्ठ अधिकारी पाहणी करण्यास आला असता त्याला ब्लिचिंग पावडरची थप्पी दाखवली जाते प्रत्येक्षात मात्र पाण्यात ब्लिचिंग पावडर वापरलेच जात नसून याची बिले मात्र उचलली जातात असे या ठिकाणी असलेल्या एका कर्मचाऱ्यांने सांगितले.

नगराध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारे जलशुद्धीकरण केंद्र दोन वर्षापासून बंद असताना नगराध्यक्षासह एकही नगरसेवकांनी याबाबत आवाज उठवला नाही. सर्वजण पालिकेत आलेल्या निधीतून कामे करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्यातच मश्गुल असून त्यांना नागरिकांच्या आरोग्याचे घेणेदेणे राहिले नसल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.

जलशुद्धीकरण केंद्र दुरूस्ती करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच ठराव घेण्यात आला होता.त्याचे टेंडर मागविण्यात आली असुन लवकरच जलशुद्धीकरण केंद्राचे काम पुर्ण करण्यात येईल.
- विशाल भोसले , प्रभारी मुख्याधिकारी

Web Title: Municipal game with the health of Majalgaonkars; Contaminated water supply has been threatening the health of citizens for the last two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.