मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवता येत नसल्याने आईची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 18:59 IST2018-05-18T18:59:34+5:302018-05-18T18:59:34+5:30
मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी हतबल झालेल्या आईने नैराश्यातून गुरुवारी संध्याकाळी आत्महत्या केली.

मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवता येत नसल्याने आईची आत्महत्या
पाटोदा (बीड) : मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी हतबल झालेल्या आईने नैराश्यातून गुरुवारी संध्याकाळी आत्महत्या केली. ही दुखद घटना तालुक्यातील वाघीरा येथे घडली असून आशाबाई पांडुरंग विघ्ने असे मृत आईचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील वाघीरा येथे पांडुरंग विघ्ने हे कुटुंबासह राहतात. त्यांना वडिलोपार्जित तीन एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. विघ्ने आणि त्यांची पत्नी आशाबाई या एकमेव उत्पन्नाच्या साधनावर घर आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवत. त्यांनी बँकेचे व काही प्रमाणात खाजगी कर्जसुद्धा घेतले आहे.
विघ्ने यांना सुभाष, दैवशाला आणि रामदास अशी तिन मुलं आहेत. सुभाष याचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झालेले असून तो काम मिळवण्यासाठी पुण्याला राहतो, मुलगी दैवशाला अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात आहे तिची परीक्षा चालू आहे तर रामदास हा बेरोजगार आहे. यामुळे आशाबाई मुलांच्या शिक्षणाचा आणि घराचा खर्च कसा पेलवणार या विवंचनेत असायच्या. यातच सततच्या नापिकीने त्यांना खर्च भागवतांना मोठी कसरत करावी लागे. आधीचे कर्ज असल्याने त्यांना नव्याने कर्जसुद्धा मिळत नव्हते या नैराश्यातून त्यांनी गुरुवारी संध्याकाळी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चांगदेव विघ्ने यांच्या माहितीवरून पाटोदा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार ए.आर. पांडे अधिक तपास करत आहेत .