मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:31 IST2021-05-24T04:31:24+5:302021-05-24T04:31:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मार्चपासून कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने कडक लॉकडाऊन जारी केला. संचारबंदी ...

मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी ?
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मार्चपासून कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने कडक लॉकडाऊन जारी केला. संचारबंदी असल्याने कारवाईच्या भीतीपोटी अनेकजण घरातच थांबून आहेत. परंतु, शुद्ध हवा घेण्यासाठी त्यांना नियमांचे अडथळे येत असल्याने ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्क्यांहून जास्त घटले आहे तर नियमित व्यायाम तसेच माॅर्निंग वॉक करणाऱ्यांनी सवय मोडलेली नाही, त्यांची पहाटेची दिनचर्या सुरूच आहे. घरात कंटाळलेले अनेकजण पहाट उजाडताच मॉर्निंग वॉकच्या नावाखाली मोकळ्या रस्त्यांवरून उघड तोंडाने फिरत आहेत. त्यांचे मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी हा मात्र प्रश्न आहे.
मागील काही वर्षात पर्यावरणाविषयी जनजागृती झाल्याने तसेच शरीर तंदुरुस्तीसाठी व्यायाम, योगा, प्राणायामकडे कल वाढल्याने अनेकांच्या दिनचर्येत पहाटेचे दोन तास व्यायाम, मॉर्निंग वॉक, योगा, प्राणायामसाठी राखीव आहेत. शहरालगत डोंगरात तसेच निसर्गसंपन्न परिसरात फिरणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच कोरानाचा शिरकाव झाल्याने अनेकांचा मॉर्निंग वॉक विस्कळीत झाला आहे. फिरायला गेलो तर कोरोना होईल, ही धास्ती वाढली आहे. तरीही मॉर्निंग वॉकसाठी अनेकजण घराबाहेर फिरताना दिसतात. काहीजण कोरोनाचे भान ठेवून तर काहीजण बिनधास्त घोळक्याने फिरतात. परंतु, कोरोना नियंत्रणात नसताना असे घराबाहेर पडणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न असतानाच शुद्ध हवेच्या परिसरात फिरणाऱ्यांना प्रतिबंध कशासाठी, असाही प्रश्न केला जात आहे.
------------
बीड शहराच्या पूर्वेला उंच ठिकाण, शुद्ध हवेची मुबलकता, देवीदेवतांचा परिसर, ओपन जीम तसेच वॉकिंग ट्रॅक असलेल्या खंडेश्वरी, दीपमाळ परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणात पहाटे फिरायला जातात. मात्र, प्रतिबंधामुळे फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या घराचे टेरेस व्यायाम, योगा, प्राणायामसाठी निवडले आहे.
----------
बीड शहराच्या पश्चिमेला पालवण चौक ते पालवण तसेच धानोरा रोड आणि देवराई परिसरात शेकडो नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जातात. महिला, पुरूष, युवक, युवतींचा यात समावेश आहे. अनेकजण सायकलद्वारे व्यायाम करतात. धानोरा, शिवदऱ्याच्या डोंगर परिसरात सूक्ष्म व्यायाम करतात तर प्रतिबंधामुळे तसेच कोरोनापासून बचावासाठी अनेकजण समूहाने जाण्याचे टाळून वैयक्तिक फिरताना दिसतात. अनेकजण मास्क वापरताना पाहायला मिळाले तर काहीजण उघड्या तोंडाने फिरताना दिसून आले.
------
पहाटेच्या वेळी गस्तीदरम्यान नजरेला पडलेच तर पोलीस नागरिकांना हटकतात, चौकशी करतात, समजावून सांगतात. तर कधी-कधी कारवाईची तंबी देतात. रक्तदाब, मधुमेह व इतर आजार लक्षात येताच पोलीसही हतबल असतात. कोरोना काळात विविध ठिकाणी बंदोबस्तामुळे मनुष्यबळाअभावी तसेच सामाजिक पातळीवर संयम राखत कारवाई टाळली जाते.
-----------
कोरोनाची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. पहाटे घराबाहेर पडल्यानंतर शुद्ध हवा मिळेल, असे वाटते, परंतु प्रतिबंध आहेत. त्यामुळे टेरेसवरच योगा, प्राणायाम नित्यनियमाने करत आहे. ऑक्सिजन जिथे मिळते, तेथे जाण्यास प्रतिबंध नसला पाहिजे.
- विष्णूदास बियाणी, बीड.
------------
मी दहा वर्षांपासून मॉर्निंग वाॅकसाठी पहाटे घराबाहेर पडतो. शुद्ध हवा मिळाल्याने दिवसभर प्रसन्नता वाटते. सूक्ष्म व्यायाम, योगा, प्राणायम, ध्यान करतो. कोरोनाचे भान राखत वयस्कर, तरूण, महिला, युवक, युवती मॉनिंग वॉक करतात.
- तुकाराम पवार, बीड.
--------