बीड जिल्ह्यात दोन लाखांहून जास्त शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 01:04 IST2020-01-06T01:03:08+5:302020-01-06T01:04:03+5:30
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ बीड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना होण्याची शक्यता असून सुमारे एक हजार कोटींची कर्जमाफी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना होऊ शकते, असा अनुमान आहे.

बीड जिल्ह्यात दोन लाखांहून जास्त शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्यात सत्तारुढ झालेल्या महाविकास आघाडी सरकारने घोषणा केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ बीड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना होण्याची शक्यता असून सुमारे एक हजार कोटींची कर्जमाफी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना होऊ शकते, असा अनुमान आहे.
जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार १७ शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ८४७.३० कोटींची कर्जमाफी झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जून २०१६ पर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते. जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार १७ सर्व सभासद शेतक-यांचे ८४७ कोटी ३० लाख रु पयांचे कर्ज माफ झाले होते. यात प्रोत्साहनपर अनुदान आणि दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा समावेश होता.
दरम्यान या कर्जमाफीत दीड लाखापेक्षा जास्त कर्ज घेणारे अनेक शेतकरी दीड लाख रु पयांच्या कर्जमाफीलाच पात्र ठरले परिणामी ५० हजार रु पयांपेक्षा जास्त कर्ज असलेली खाती थकित राहिली.
मागील तीन वर्षात सरसकट कर्जमाफी होईल या आशेने शेतक-यांनी त्यांच्याकडील थकबाकी जमा करण्याचे टाळले. त्याचबरोबर नवीन कर्ज घेण्याचेही टाळले. दरम्यान राज्यातील सत्ता बदलानंतर कर्जमाफीच्या अनुषंगाने राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या, तसा निर्णयही घेतला. त्यानुसार २०१५ ते २०१९ या कालावधीत पीक कर्ज घेतलेले मध्यम आणि पुर्नगठन केलेल्या कर्जाची तपासणी करून जानेवारीपर्यंत अहवाल मागविले आहेत. जिल्ह्यात ७३३ सोसायट्या असल्याने त्यांच्याकडील माहिती जिल्हा विशेष लेखापरीक्षकांच्या स्तरावर प्राप्त केली जात आहे. तसेच शासकीय लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. २९ जून २०१५ ला जे कर्ज खाते २०१६ मधील थकित होते त्यांची कर्जमाफी झाली होती. आता ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या थकबाकीदार शेतक-यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
आधार लिंक झालेल्या व न झालेल्या शेतक-यांची यादी तयार करणे सुरु असून, ७ जानेवारीनंतर पात्र शेतक-यांचा आकडा आणखी स्पष्ट होणार आहे.
एक हजार कोटींच्या माफीची शक्यता
८६५ कोटी ८८ लाख ३५९ रुपयांचे पीककर्ज वाटप केलेले आहे, तर १४७ कोटी ४८ लाख ८३२ रुपयांचे कर्ज पुर्नगठीत केलेले आहे.
कर्जमाफी योजनेच्या निकषानुसार जवळपास एक हजार कोटींची कर्जमाफी बीड जिल्ह्यातील शेतक-यांना होण्याची शक्यता आहे.
१ लाख १७ हजार खाते आधार लिंक नाहीत
बीड जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ४९७ शेतक-यांचे आधार लिंक अद्याप बाकी आहे. शेतकºयाचे ज्या बॅँकेत खाते आहे, जेथून त्याने कर्ज घेतले आहे, त्या बॅँकेच्या संबंधित शाखेत आधार क्रमांक लिंक करावे लागणार आहे.
विशेष म्हणजे ७८ हजार ७०७ आधारलिंक नसलेले खातेदार बीड जिल्हा सहकारी बॅँकेचे आहेत. आधार क्र मांक नसलेल्या शेतकरी खातेदारांची माहिती बँकांनी तयार करुन ७ जानेवारीस प्रसिद्ध करण्याचे निर्देश यापुर्वीच प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिलेले आहेत.