एक महिन्यानंतर अपहरणकर्ता पाेलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:18+5:302021-06-01T04:25:18+5:30
दिंद्रुड (जि. बीड ) : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतून २५ एप्रिल रोजी अपहरण झालेल्या मुलीचा शोध लावण्यात तब्बल ...

एक महिन्यानंतर अपहरणकर्ता पाेलिसांच्या ताब्यात
दिंद्रुड (जि. बीड ) : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतून २५ एप्रिल रोजी अपहरण झालेल्या मुलीचा शोध लावण्यात तब्बल एक महिना सहा दिवसांनंतर पोलिसांना यश आले. दिंद्रुड पोलिसांनी अपहृत मुलीसह अपहरणकर्त्याला नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथून सोमवारी ताब्यात घेतले.
माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील १७ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. २५ एप्रिल रोजी तिच्या पालकांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर २९ मे रोजी मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी ४० हजार रुपये मागितल्याची तक्रार वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. पोलिसांनी हे आरोप नाकारत मुलीचा शोध सुरू असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रविवारी पोलिसांनी फोन ट्रेसिंगच्या माध्यमातून मुलीचा माग काढला. अपहृत मुलगी व अपहरणकर्ता हे नांदेड तालुक्यात रविवारी रात्री पुण्याहून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक आणि मुलीचे नातेवाईक नांदेडला रवाना झाले होते. यानंतर नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे मुलीचा शोध लागला. अपहरणकर्ता आरोपी अभय सोनकांबळे (२२) व पीडित मुलगी यास दिंद्रुड पोलिसांनी ताब्यात घेतले. दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि. अनिल गव्हाणकरसह पोलीस अंमलदार बालाजी सुरेवाड, आकाश जाधव, संतोष बदने यांनी ही कारवाई यशस्वी केली.
गुन्हा दाखल झाला त्यावेळी मी सुटीवर होतो. रुजू झाल्यापासून याप्रकरणी स्वत: जातीने लक्ष दिले आहे. गावातील ग्रामस्थांकडे वेळोवेळी संपर्क करत मुलीचा व अपहरणकर्त्याचा शोध लागावा यासाठी कसोशीने प्रयत्न केले. अपहरणकर्त्याने मोबाइल सीमकार्ड वेळोवेळी बदलल्यामुळे लोकेशन सापडण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, त्यांच्या पालकांवर करडी नजर ठेवल्याने व गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही या प्रकरणाचा छडा लावण्यात यशस्वी झालो आहोत.
- अनिल गव्हाणकर, सहायक पोलीस निरीक्षक, दिंद्रुड