बीडमध्ये राडा: राज ठाकरेंकडून पोलीस अधिकाऱ्यांची शाळा, 'तो' प्रश्न विचारत पकडलं कोंडीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 21:40 IST2024-08-09T21:38:59+5:302024-08-09T21:40:47+5:30
सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नामुळे राज ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतल्याचं समजते.

बीडमध्ये राडा: राज ठाकरेंकडून पोलीस अधिकाऱ्यांची शाळा, 'तो' प्रश्न विचारत पकडलं कोंडीत!
Beed Raj Thackeray ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बीडमध्ये पोहोचलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा अडवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राज ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपारीही फेकण्यात आली. त्यामुळे शिवसैनिक आणि महाराष्ट्रसैनिक आमने-सामने आले आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. या सगळ्या प्रकारानंतर राज ठाकरे बीडमधील ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथं बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक दाखल झाले. सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नामुळे राज यांनी या अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतल्याचं समजते.
"ही घटना घडण्यापूर्वी तुम्हाला इंटेलिजन्सकडून काही माहिती मिळाली नव्हती का?" असा सवाल विचारत राज ठाकरेंनी पोलीस अधिकाऱ्यांची कोंडी केली. तसंच हा प्रकार घडायला नको होता, असं म्हणत संपूर्ण घटनेविषयी खेदही व्यक्त केला.
सुपारी फेकणारे ८ जण ताब्यात
राज ठाकरे हे सुपारी घेऊन काम करतात, त्यामुळे विधानसभेला कुणाची सुपारी घेतली असा जाब विचारण्यासाठी आम्ही आलोय, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या वाहनासमोर सुपारी फेकल्या. यामुळे झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आठ पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं.
कार्यकर्ते आमनेसामने
बीड दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरेंना विरोध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत मनसे कार्यकर्त्यांचा संघर्ष झाला. "ठाकरे गटाचा जिल्हाध्यक्ष हा गुटखा चोर असून त्याचा मराठा आरक्षणाशी काहीही संबंध नाही. मराठा समन्वयकांशी आमचं बोलणं झालं होतं. मात्र हा गुटखा चोर मनसे कार्यकर्ता बनून आमच्या रॅलीत आला, ते २-३ जण होते, त्यांना मनसे स्टाईलनं चोप दिला आहे. आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. मात्र त्यांना कपडे फाटेपर्यंत मारलं असून इथून पुढे राज ठाकरेच नव्हे तर कुठल्याही नेत्यासमोर अशी स्टंटबाजी करणार नाही," असं या राड्यानंतर मनसे पदाधिकाऱ्याने सांगितले.