पाटोद्यात उभारणार एमआयडीसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:26 IST2018-10-23T00:26:19+5:302018-10-23T00:26:48+5:30
दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा येथे आता १३ हेक्टरवर ६० भूखंड असलेली सुविधायुक्त एमआयडीसी उभारली जाणार आहे. यासाठी नुकतीच मुख्य अभियंत्यांनी मंजुरी दिली आहे. एप्रिल २०१९ मध्ये या कामाचे नारळ फुटणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या व तालुक्याच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.

पाटोद्यात उभारणार एमआयडीसी
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा येथे आता १३ हेक्टरवर ६० भूखंड असलेली सुविधायुक्त एमआयडीसी उभारली जाणार आहे. यासाठी नुकतीच मुख्य अभियंत्यांनी मंजुरी दिली आहे. एप्रिल २०१९ मध्ये या कामाचे नारळ फुटणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या व तालुक्याच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.
पाटोदा शहरापासून तीन किमी अंतरावर मांजरसुंबा रस्त्यावर एमआयडीसी उभारण्यासंदर्भात बीडच्या कार्यालयाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता. उप अभियंता विनायक मुळे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे या संदर्भात पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला. औरंगाबादच्या अधिकाऱ्यांनी पाटोद्याला येऊन स्थळ पाहणी केली. तसेच सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. इतर आवश्यक सुविधा मिळू शकतात का ? याचीही चाचपणी केली. या सर्व पाहणीमध्ये अधिकाºयांकडून सकारात्मक बाजू जाताच औरंगाबादचे मुख्य अभियंता सुभाष तुपे यांनी यासाठी मंजुरी दिली आहे. चार दिवसांपूर्वी मंजुरीची कागदपत्रे बीड कार्यालयात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
वर्षभरात होणार काम पूर्ण
एप्रिलमध्ये नारळ फुटल्यानंतर साधारण वर्षभरात संपूर्ण एमआयडीसीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असणार आहे. सध्या या संदर्भात टेंडर प्रक्रिया सुरु आहे. रस्ते व इमारतींसाठी जास्त वेळ लागत असला तरी ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे.
रोजगाराची संधी उपलब्ध
आष्टी, पाटोदा, शिरुर कासार या तालुक्यांना सर्वाधिक दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागलेल्या आहेत. त्यामुळे येथील तरुण रोजगारीसाठी मोठ्या शहरासाठी गेलेले आहेत. ही एमआयडीसी पाटोद्यात उभारल्यास तरुणांना येथेच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
दळणवळणाची सुविधा आवश्यक
पाटोदा येथे सुसज्ज, सुविधायुक्त एमआयडीसी झाली तरीही येथे कच्चा माल आणण्यासाठी व पक्का माल नेण्यासाठी दर्जेदार व रुंद रस्ते होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीनेही उपाययोजना करणे आवश्यक आहे.