परळी: बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडला (Walmi Karad) आज न्यायलयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याच्यावर मकोका लावला असून, 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ही माहिती समोर येताच तिकडे परळीमध्ये कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे.
पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडची 15 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर आज न्यायालयाने कराडला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. तसेच, कराडवर मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सीआयडीकडून सांगण्यात आले आहे.
परळी बंदची हाकआज परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवरजवळ कराड समर्थकांनी जोरदार निदर्शने केली. यादरम्यान टायर जाळण्याचा प्रयत्न झाला, पण पोलिसांनी हा प्रकार रोखला. याशिवाय, परळी शहर पोलीस ठाण्यासमोर वाल्मीक कराडच्या मातोश्री पारुबाई, पत्नी मंजिरी कराड व सून सहभागी झाल्या आहेत. तिकडे, वाल्मीक कराडच्या पांगरी गावातही परळी बीड रस्त्यावर कार्यकर्त्यांनी टायर जाळले.
कोर्टात काय झाले? वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा तर दाखल आहेच, शिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कराडशी संबंधित आहे. याचा तपास सीआयडीला करायचा आहे. आरोपी आणि वाल्मीक कराडला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, वाल्मीक कराडला आज बीड जेलमध्ये नेले जाणार आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवले जाईल. त्यानंतर उद्या मकोकाअंतर्गत ताब्यात घेऊन केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.