मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; जुनी एसआयटी बरखास्त

By सोमनाथ खताळ | Updated: January 13, 2025 21:47 IST2025-01-13T21:47:01+5:302025-01-13T21:47:32+5:30

नवीन स्थापन, बसवराज तेली कायम : आता नऊ ऐवजी सहा जणांचा समावेश

Massajog Sarpanch Santosh Deshmukh murder case; Old SIT dismissed, new one formed | मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; जुनी एसआयटी बरखास्त

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; जुनी एसआयटी बरखास्त

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन केलेल्या एसआयटीतील अधिकाऱ्यांचे फोटो खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याच्यासोबत दिसले होते. त्यानंतर त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे जूनी एसआयटी बरखास्त करून नवीनची स्थापना केली आहे. यामध्ये आता नऊ ऐवजी सहा जणांचा समावेश आहे. उप महानिरीक्षक बसवराज तेली हे एसआयटीचे प्रमुख कायम राहणार आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले होते. सत्ताधारी, विरोधी आमदारांनी यावर आवाज उठविल्यानंतर हत्यासह दोन कोटी रूपयांच्या खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याप्रमाणे १ जानेवारीला उप महानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली होती. यात बीड जिल्ह्यातीलच अधिकारी, कर्मचारी घेण्यात आले होते. तेली यांनी तपासाला सुरूवात करत आरोपींची चौकशीही केली होती.

अशातच एलसीबीतील उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचा खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याच्यासोबत फोटो व्हायरल झाला. त्यानंतर यावर सर्वांनीच आक्षेप घेतला. एसआयटीतील अधिकाऱ्यांचेच आरोपींसोबत संगणमत असल्यास न्याय कसा मिळणार? असा प्रश्न उपस्थित करत ती बदलण्याची मागणी केली जात होती. याच अनुषंगाने आता जुनी एसआयटी बरखास्त करून नवीनच स्थापना केली आहे. भाजपचे आ.सुरेश धस यांनी सोमवारी सायंकाळी माध्यमांना याबाबत माहिती दिली.

बीड पोलिसांवर अविश्वास?

मागील काही दिवसांपासून बीड पोलिस वादात सापडत आहेत. आ.सुरेश धस यांनी परळीत ओरीजनल पोलिसच राहिले नाहीत. तेथे सीआयडी, सावधान इंडियातील कलाकार आणा, असे म्हणत संशय व्यक्त केला. खा.बजरंग सोनवणे यांनीही सोमवारी पोलिसांच्या भूमिकेवर आणि तपासावर प्रश्न उपस्थित केला. तर एलसीबी सारख्या महत्वाच्या गुन्हे अन्वेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आरोपींसोबत फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे बीड पोलिस वादात सापडत आहेत. तसेच त्यांच्यावर अविश्वास दाखविला जात आहे. मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख यांनीही पोलिसांवर निशाणा साधला आहे.

नव्या एसआयटीत कोण?

किरण पाटील (अपर पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)
अनिल गुजर (पोलीस उप अधीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड)

सुभाष मुठे (पोलीस निरीक्षक,राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड)

अक्षयकुमार ठिकणे (पोलीस निरीक्षक, भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)

शर्मिला साळुंखे (पोलीस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)

दिपाली पवार (पोलीस हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)

जुने पथकात कोण होते?

अनिल गुजर - पोलीस उपअधीक्षक, सीआयडी बीड

विजयसिंग शिवलाल जोनवाल स.पो. निरीक्षक, एलसीबी बीड
महेश विघ्ने - पोलिस उपनिरीक्षक, एलसीबी बीड

आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक, केज
तुळशीराम जगताप - सहा. पो. उ. निरीक्षक, एलसीबी बीड

मनोज राजेंद्र वाघ - पोलीस हवालदार, एलसीबी बीड
चंद्रकांत एस.काळकुटे - पोलीस नाईक, केज

बाळासाहेब देविदास अहंकारे - पोलीस नाईक, केज
संतोष भगवानराव गित्ते - पोलीस शिपाई, केज

आंदोलनानंतर अधिकाऱ्यांची धाव

धनंजय देशमुख यांनी सकाळी आंदोलन केल्यानंतर सायंकाळी सीआयडी आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांची भेट घेतली. तपासाबाबत जी माहिती हवी होती, त्याबाबत त्यांना लेखी दिल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले. तसेच मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तपास कुठपर्यंत आला आहे, हे बसवराज तेली सांगणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना मंगळवारी होणारे आंदोलन थांबविण्याची विनंती केली आहे. तपास योग्य चालू आहे. दोषी असणाऱ्यांना सोडणार नाही, असा विश्वास अधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच सीआयडी व पोलिस अधीक्षकांना सरकारच्यावतीने फोन झाला. मी तपासाबाबत समाधानी आहे किंवा नाही, हे तेली यांना भेटून नंतरच सांगेल, असेही देशमुख म्हणाले. सोमवारी रात्री साडे नऊ वाजता त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली.

Web Title: Massajog Sarpanch Santosh Deshmukh murder case; Old SIT dismissed, new one formed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.