मस्साजाेग हत्या प्रकरण; दोषारोप पत्रातून सरपंच देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्याचे नाव वगळले

By सोमनाथ खताळ | Updated: March 1, 2025 14:46 IST2025-03-01T14:43:28+5:302025-03-01T14:46:07+5:30

या सर्व हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे.

Massajeg Sarpanch Deshmukh Murder Case; The name of the locator was omitted from the charge sheet | मस्साजाेग हत्या प्रकरण; दोषारोप पत्रातून सरपंच देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्याचे नाव वगळले

मस्साजाेग हत्या प्रकरण; दोषारोप पत्रातून सरपंच देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्याचे नाव वगळले

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर दोन्ही गुन्ह्यांचे दोषारोपपत्र ‘सीआयडी’कडून न्यायालयात २७ फेब्रुवारी दाखल केले होते. हे दोषाराेपपत्र एक हजार पानांचे होते. यातून सरपंचाचे लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणे याचे नाव वगळण्यात आले आहे. त्याच्याविरोधात पुरावा आढळला नसल्याचा खुलासा सीआयडीने दोषारोपपत्रातून केला आहे. तर या सर्व हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे.

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. तसेच याच गुन्ह्याच्या काही दिवस आगोदर ॲट्रॉसिटी व मारहाण आणि खंडणीचे गुन्हे घडले होते. या तिन्ही गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे होता. या गुन्ह्यांमध्ये वाल्मीक कराड याच्यासह नऊ जणांचा समावेश होता. यातील आठ आरोपी अटक असून, कृष्णा आंधळे हा घटनेपासून फरारच आहे. दरम्यान, सीआयडीने अनेक आरोप-प्रत्यारोप झालेल्या या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करून २७ फेब्रुवारीला एक हजार पानांचे दोषारोपपत्र बीडच्य न्यायालयात दाखल केले होते. आता हे प्रकरण केज न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे.

अशी आहेत आरोपींची नावे
वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे व कृष्णा आंधळे, अशी आरोपींची नावे आतापर्यंत हत्या प्रकरणात होती. यातील कृष्णा वगळता सर्वच आरोपी अटक आहेत. दरम्यान, सिद्धार्थने लोकेशन दिल्याचा आरोप होता. सीआयडीने तपास केला असता त्याच्याविरोधात पुरावा आढळला नाही. त्यामुळे त्याच्यावर कोणताही आरोप ठेवला नाही. सध्या सिद्धार्थ हा न्यायालयीन कोठडीत असून लवकरच बाहेर येणार असल्याचे सांगण्यात आले.

कृष्णाच्या मागावर चार पथके
कृष्णा आंधळेला अटक करण्यासह इतर विविध नऊ मागण्यांसाठी देशमुख कुटुंब व मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. हे आंदोलन सोडविताना पोलिसांनी कृष्णाच्या शोधासाठी चार पथके असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. यासह सीआयडीचे पथकेही मागावर आहेत. परंतु अद्यापतरी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

Web Title: Massajeg Sarpanch Deshmukh Murder Case; The name of the locator was omitted from the charge sheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.