The Martyrs The Lord taught the lesson of friendship | शहीद परमेश्वरने दिला मित्रप्रेमाचा धडा
शहीद परमेश्वरने दिला मित्रप्रेमाचा धडा

ठळक मुद्देयुध्द सरावादरम्यान मित्राला वाचविताना परमेश्वरला वीरमरण : आज घागरवाड्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अनिल महाजन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : युद्ध सरावादरम्यान रणगाडे हलविण्याचे प्रशिक्षण सुरु होते. सहकारी मित्र हा रणगाड्याखाली जाताना वाचवा, वाचवा अशी हाक देत होता. त्याला वाचविण्यासाठी धाव घेणाऱ्या परमेश्वरच्या डोळ्याच्या वरील बाजुस जबर मार बसताच तो कोसळला. कर्तव्य बजावताना त्याला वीरमरण आले. मित्राचे प्राण वाचवून मैत्रीचा नवा आदर्श त्याने घालून दिला.
आर्टिलरी फोर्समधील जवान तथा तालूक्यातील घागरवडा येथील परमेश्वर बालासाहेब जाधवर यांना वीर मरण आल्याचे वृत्त धडकताच अनेकांना धक्का बसला. प्रत्यक्षात या घटनेची माहिती जाणून घेताना ‘देश असो, नागरिक असो अथवा सोबतचा सहकारी असो, त्याला वाचविण्याचे धाडसी ध्येय उराशी बाळगत सैनिक कामगिरी करतात हा वस्तुपाठ परमेश्वरने युध्द सरावादरम्यान पुन्हा एकदा घालून दिला. युध्दात एखाद्या ठिकाणाहून रणगाडे दुसºया ठिकाणी हलविताना जर दहा किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असेल तर ते वाहनाद्वारे हलविली जातात. अशा वेळी रणगाडे कशी हलवावीत याचे प्रशिक्षण दिले जात होते.
यावेळी परमेश्वरचा सहकारी जवान रणगाड्याखाली जाताना त्याने वाचवा..वाचवा म्हणून हाक दिली तोच परमेश्वर धावत वाचविण्यासाठी त्याच्याजवळ गेला. त्याचवेळी परमेश्वरच्या डाव्या डोळ्याच्या वर जोरदार मार लागला. त्याच्या मज्जातंतूला जोरदार झटका बसल्याने मेंदूचा रक्तस्त्राव बंद झाला आणि परमेश्वरला वीरमरण आले. या घटनेत सहकारी जवान जखमी झाला आहे. जाताना मित्रांसाठी परमेश्वरने आदर्श घालून दिल्याचे सुभेदार अंकुश वळकुंडे म्हणाले. परमेश्वरच्या मेंदूला जोराचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.
अंत्यविधी, स्मारकासाठी शेतक-याने दिली जागा
गुरूवारी दुपारपर्यंत शहीद परमेश्वर जाधवर यांचा मृतदेह घागरवाडा येथे पोहोचेल असा अंदाज असून गावाजवळ असणारी शेतातील जागा मालक भीमराव केरबा नागरगोजे यांनी अंत्यविधी व स्मारक उभारणीसाठी दिली असून तेथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कारासाठी प्रशासकीय यंत्रणेने नियोजन केले असून तहसीलदार व्ही. एस. शेडोळकर, नायब तहसीलदार सुहास हजारे, रामेश्वर स्वामी यांनी गावात जाऊन अंत्यसंस्काराच्या ठिकाणाची पहाणी केली. पोलीस यंत्रणेस सुरक्षेबाबत सूचना केल्या.
काही तासांपूर्वीच झाले होते बोलणे
मूळचे शेतकरी व ऊस तोडणी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारे बालासाहेब जाधवर व भाऊ राजेभाऊ जाधवर यांचे संयुक्त कुटूंब घागरवाडा येथे आहे. परमेश्वरचे माध्यमिक शिक्षण उमरी (ता.माजलगाव) येथे तर उच्च शिक्षण पिंपळनेर येथे झाले. १९ नाव्हेंबरला दुपारी चारच्या सुमारास वडिलांना फोनवर कुटुंबाची खुशाली विचारली. सायंकाळी भाऊ रामेश्वरशी तो बोलला. हेच शेवटचे बोलणे ठरले. यानंतर युद्ध सरावादरम्यान परमेश्वरला वीरमरण आले. रात्री दु:खद वार्ता कानी पडल्यावर घागरवाडा गावावर दु:खाचे सावट पसरले.

Web Title: The Martyrs The Lord taught the lesson of friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.