Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 16:02 IST2018-08-13T16:01:29+5:302018-08-13T16:02:09+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणखी एका २० वर्षीय युवकाने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली.

Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या
बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणखी एका २० वर्षीय युवकाने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथे घडली. जिल्ह्यात यापूर्वीच सहा जणांनी आरक्षणासाठी जीवन संपविलेले आहे.
राहुल पद्माकर हावळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. राहुलचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांना अडीच एकर जमीन आहे. राहुल हा त्यांना एकुलता एक मुलगा होता. उच्च शिक्षण घेऊन त्याला बी. फार्मसी करायची होती. मात्र, मराठा समाजाला आरक्षण नसल्याने बी. फार्मसीला त्याचा क्रमांक लागला नाही. त्यामुळे तो नैराश्यात होता, असे त्याचा चुलत भाऊ विकास रामहरी हावळे याने पोलिसांना दिलेल्या जवाबात नमूद आहे.
यातूनच त्याने ११ आॅगस्ट रोजी सकाळी राहत्या घरीच विषारी द्रव प्राशन केले होते. हा प्रकार घरच्यांना समजताच त्यांनी त्याला नेकनूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली. अखेर आज सकाळी ७.१५ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, राहुलच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसह घरातील एका सदस्यास शासकीय नौकरी द्यावी यासाठी नातेवाईकांसह समाजबांधवांनी जिल्हा रुग्णालय चौकीसमोर ठिय्या मांडला. त्यानंतर तात्काळ उप विभागीय अधिकारी विकास माने, पो. नि. सय्यद सुलेमान यांनी रुग्णालयात धाव घेतली. प्रशासनाच्या वतीने मदतीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले. विकास हावळे यांच्या खबरीवरुन जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.