'आधी मराठा आरक्षण, नंतर निवडणूक'; ग्रामपंचायत निवडणुकीवर उमरी ग्रामस्थांचा बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 19:09 IST2023-10-17T19:00:17+5:302023-10-17T19:09:07+5:30
एकही उमेदवार अर्ज भरणार नाही, उमरी ग्रामस्थांनी केला एकमुखी ठराव

'आधी मराठा आरक्षण, नंतर निवडणूक'; ग्रामपंचायत निवडणुकीवर उमरी ग्रामस्थांचा बहिष्कार
माजलगाव (बीड) : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक नाही, अशी भूमिका घेत उमरी ग्रामस्थांनी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले.निवडणुकीत एकही उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत, असे लेखी निवेदन तहसीलदार यांना ग्रामस्थांनी दिले आहे.
उमरी येथील आज सकाळी ११ वाजता ग्रामस्थ,पॅनल प्रमुख व सरपंच पदाचे उमेदवार यांची एकत्रित बैठक झाली. यात एकमुखी ठराव घेतला की, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार असेल. गावातील एकाही उमेदवाराने अर्ज दाखल करायचा नाही. अशा प्रकारे ठराव घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकणारे उमरी ही गाव राज्यातील एकमेव ठरले आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका स्थगित करा, जर निवडणुका घेतल्या तर उमरी येथील एकही उमेदवार निवडणूकीत उमेदवारी दाखल करणार नसल्याचा निवेदन उमरी ग्रामस्थांनी दिले. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दोन दिवसानंतरही एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.
गाव पातळीवर निर्णय घ्यावा
तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.गावातील उमेदवारांनी गाव पातळीवर निर्णय घेऊन निवडणूक लढवावी. राजकारणामध्ये कधीही मराठा क्रांती मोर्चा सामील झाला नाही व सामील होणार नाही.
- राजेंद्र होके पाटील, मराठा क्रांती मोर्चा बीड
लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकांनी सहभाग नोंदवावा. निवडणुका ठरवलेल्या वेळेतच होत असतात. निवडणुकीवर बहिष्कार न टाकता सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन लोंकानी निवडणुका लढवाव्यात.
-वर्षा मनाळे, तहसीलदार माजलगाव