मंजरथ गावच्या सरपंचपदाची कमान ऐरोनॉटीकल इंजिनिअर ऋतुजाच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 16:28 IST2017-12-27T16:27:14+5:302017-12-27T16:28:59+5:30
माजलगाव तालुक्यातील मंजरथ या गावच्या सरपंचपदी २५ वर्षीय ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या तरुणीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे सरपंच पदासाठी झालेल्या या निवडणुकीत तिने दोन पुरुष उमेदवारांचा पराभव केला.

मंजरथ गावच्या सरपंचपदाची कमान ऐरोनॉटीकल इंजिनिअर ऋतुजाच्या हाती
माजलगाव (बीड) : माजलगाव तालुक्यातील मंजरथ या गावच्या सरपंचपदी २५ वर्षीय ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या तरुणीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे सरपंच पदासाठी झालेल्या या निवडणुकीत तिने दोन पुरुष उमेदवारांचा पराभव केला. ऋतुजा उच्च शिक्षित असून तिने ऐरोनॉटिकल सायन्स मध्ये एमटेकची पदवी प्राप्त केली आहे.
मंजरथ या गावाचे सरपंच पद सर्वसाधारण वर्गासाठी राखीव होते. यामुळे या निवडणुकीत चुरस होती. असे असताना देखील निवडणूक लढवून ऋतुजाने या निवडणुकीत उमेदवारी दाखल केली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत तिने विजय अक्षरशः खेचून आणला.
एमटेक आहे ऋतुजा
ऋतुजा उच्च शिक्षित आहे. तिने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ऐरोनॉटिकल सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केले असून ती इंजिनीअर आहे. तिने ‘एम टेक’चे शिक्षणही पूर्ण केले आहे. अवघ्या पंचवीसाव्या वर्षी सरपंच झालेल्या ऋतुजाचे स्वप्न गावचा विकास करण्याचे आहे. तिच्या विजयाने गावात आनंदाचे वातावरण आहे.