Manjara River Flood : मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या १८ जणांना काढले सुखरूप बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 18:45 IST2021-09-28T18:44:53+5:302021-09-28T18:45:40+5:30
Manjara River Flood धनेगाव येथील मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने धरणाच्या खाली असलेल्या गावात महापूर आलेला आहे.

Manjara River Flood : मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या १८ जणांना काढले सुखरूप बाहेर
केज : अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतात पाणी घुसून पुरुष, महिला व लहान बालके असे १८ व्यक्ती शेतात असलेल्या घरावर अडकले होते. आ. नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देऊन रेस्क्यू टीम पाठवीण्याचे सांगितले होते. त्यानुसार बीड येथून आलेल्या रेस्क्यू टीमने पाण्यात अडकलेल्या लोकांसह जनावरांना सुखरूप बाहेर काढले.
धनेगाव येथील मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने धरणाच्या खाली असलेल्या गावात महापूर आलेला आहे. त्याचा सर्वात जास्त फटका आपेगाव ला बसला आहे. या पुराच्या पाण्यात अर्धे आपेगाव गेले आहे. बालाजी बाजीराव तट, दत्ता काळदाते, मनोज काळदाते यांच्या शेतात काम करणारे सालगडी व त्यांचे कुटुंब पाण्यात अडकले होते. या तिघांच्याही शेतातील सालगडी व त्यांचे कुटुंब असे १८ पुरूष, महिला व लहान बालके बालाजी तट यांच्या शेतात असलेल्या घराच्या स्लॅपवर बसले होते. तर जनावरेही गोठ्यात होते. पाण्याचे प्रमाण वाढू लागल्याने व हे शेत गावापासून एक किलोमीटर अंतरावर असल्याने त्या ठिकाणी कसलाही संपर्क होत नव्हता. या लोकांना वाचवण्यासाठी बीड येथील रेस्क्यू टीम दाखल झाली होती या रेस्क्यू टीमने पाण्यात अडकलेल्या १८ लोकांना तसेच जनावरे, कुत्रे व शेळ्या यांना सुखरूप बाहेर काढले लोकांना सुखरूप वाचवील्याने या टीमचे अभिनंदन व सत्कार अपेगावकरांच्या वतीने करण्यात आला.
गावकऱ्यांनी केली मदत
बीड यातून आलेल्या रेस्क्यू टीमला गावकऱ्यांनी मदत केली. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कचरू रंजवे, निलेश शिंदे यांनी यांनी या कामी सहकार्य केले.
यांना वाचवीले -
प्रकाश परशुराम मोरे ४०
गोवर्धन प्रकाश मोरे ३४
शुभम प्रकाश मोरे १८
प्रांजली प्रकाश मोरे १२
किरण प्रकाश मोरे ११
बबन सुदाम जाधव ४५
बालाजी बबन जाधव २४
कान्होपात्रा बबन जाधव ३९
लक्ष्मी बबन जाधव १८
परमेश्वर कचरू थावरे २६
दिपाली परमेश्वर थावरे २३
संघर्ष परमेश्वर थावरे ०३
यादव तुळशीराम लाखुने ३६
कल्पना यादव लाखुने ३४
ओमकार यादव लाखुने १३
पुजा यादव लाखुने ११
कौशल्याबाई तुळशीराम लाखुने ६०
कचरू सोपान दळवी ५०