Santosh Deshmukh Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचा सीआयडी तपास करत आहे. या प्रकरणात अजूनही तीन आरोपी फरार आहेत. जिल्ह्यातील जनतेकडून आरोपींना अटक करुन शिक्षेची मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी लोक पुढं येत आहेत. आज बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील नागरिकांनी गोळा केलेला ४३ लाख रुपयांचा निधी देशमुख कुटुंबीयांना सुपूर्द केला.
माजलगाव तालुक्यातील नागरिकांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुबीयांसाठी आर्थिक मदत गोळा केली. यात ४३ लाखांचा निधी गोळा झाला. आज ही रक्कम नागरिकांनी देशमुख यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द केली. माजलगाव तालुक्यातील नागरिकांनी ही रक्कम मदत फेरीच्या माध्यमातून गोळा केली. आज आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत देशमुख यांच्या कुटुबीयांना रक्कमचे चेक दिला.
यावेळी बोलताना आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, या हत्येप्रकरणाचा तपास अद्याप पाहिजे तेवढ्या सतर्कतेने होत नाही. ही बाब मी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार आहे, असंही सोळंके म्हणाले. हे कुटुंब आपलेच आहे या भावनेतून आपण सर्वांनी याकडे बघितले पाहिजे. गेल्या पाच वर्षात सुरु असलेली गुंडगीरी. पाच वर्षापासून यांना मोकळ रान मिळाले होते. या सरपंच संतोष देशमुख यांनी धाडसाने मुकाबला केला. त्यांना त्यांच्या प्राणाची आहुती त्यांना द्यावी लागली. यापुढे जिल्ह्यात गुन्हेगारी मोडीत काढली पाहिजे. लोकांना त्यांचे व्यवसाय करता आले पाहिजेत. नव्या प्रकल्पामुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळतो, असंही सोळंके म्हणाले.
वाल्मीक कराडची न्यायालयात मोठी मागणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने वाल्मीक कराड याची चौकशी सुरू आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी कराड याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. कोर्टाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच दिवशी वाल्मीक कराड याने कोर्टाकडे २४ तास एका मदतनीसाची मागणी केली होती. ही मागणी कोर्टाने फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे.
वाल्मीक कराड याला ३१ डिसेंबर दिवशी रात्री बीड येथील कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने कराड याला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. यानंतर कराड याने पोलिसांकडे काही सुविधांच्या मागण्या केल्या होत्या. कोठडीत आपल्याला २४ तास मदतनीस मिळावा अशी मागणी त्याने केली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे.