Majalgaon Parishad Election Result 2025: माजलगावात नगराध्यक्षपदी 'तुतारी'चा गजर; तर आमदार सोळंकेंचा उमेदवार तीन नंबरवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 18:10 IST2025-12-21T18:05:45+5:302025-12-21T18:10:28+5:30
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये एकीचे प्रदर्शन दिसून आल्याने जोरदार मुसंडी मारली

Majalgaon Parishad Election Result 2025: माजलगावात नगराध्यक्षपदी 'तुतारी'चा गजर; तर आमदार सोळंकेंचा उमेदवार तीन नंबरवर
माजलगाव ( बीड) : येथील नगरपालिकेची निवडणूकीपुर्वी विकासाचा गाजावाजा करणाऱ्या येथील आमदार प्रकाश सोळंके यांच्या उमेदवाराला मतदारांनी तीन नंबर वर पाठवत मोठा उलटफेर केला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये एकीचे प्रदर्शन दिसून आल्याने माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या सून महरीन शिफा बिलाल चाऊस यांनी अडीच हजार मतांनी दणदणीत विजय प्राप्त करत नगराध्यक्ष पद पटकावले.
यापूर्वी नगरपालिकेच्या अनेक निवडणुकीत भाजप, शिवसेना यांचा बालेकिल्ला समजला जात होता. भाजपाचे उमेदवार संध्या ज्ञानेश्वर मेंडके या जातीय समीकरणात विजय होतील असे दिसत होते. परंतु येथील भाजपामध्ये नेतृत्व करणारे कोणीच नसल्याने व राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत प्रभाग चार मधून दीपक मेंडके हे भाजपच्या तिकिटावर निवडून जरी आले असले तरी हा त्यांचा विजय हा त्यांच्या स्वकर्तत्वावर असल्याचे बोलले जात होते. तर याच प्रभागातून दुसऱ्या जागेवर त्यांच्या पत्नी रेश्मा मेंडके यांचा देखील विजय झाला. भाजप शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या जवळपास अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याचे दिसून आले. यामुळे भाजप व दोन्ही शिवसेनेचा सुपडा साफ झाल्याचे दिसून आले.
मागील अनेक वर्षापासून विकासाचा गाजावाजा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. प्रकाश सोळंके यांनी शहराच्या विकासासाठी २०० ते ३००कोटी पेक्षा जास्त निधी आणला. मात्र, असला तरी शहरात झालेली कामे ही अतिशय निकृष्ट होत असताना आमदार सोळंके यांनी याबाबत भ्र शब्द देखील वापरला नसल्याने भ्रष्टाचाराला त्यांचे प्रोत्साहन दिसून आले. शहराच्या विकासासाठी आलेले करोडो रुपयांचा निधी पाण्यात गेल्यामुळे मतदारांनी त्यांच्या उमेदवाराला तीन नंबरवर पाठवले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून महरीन शिफा बिलाल चाऊस यांना तिकीट दिले होते . या निवडणुकीत यांच्या प्रचाराची धुरा बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी उचलली होती. त्याचबरोबर मोहन जगताप, नारायण डक, सहाल चाऊस यांनी एकी दाखवल्याने त्यांचा विजय सुकर होऊ शकला. त्यामुळे सहाल चाऊस यांच्या सून नगराध्यक्ष पदावर विराजमान होऊ शकल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे १० , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १० , काँग्रेस १ ,भाजप १, एम.आय.एम --१ व अपक्ष ३ नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले.
अनेकांना मतदारांनी नाकारले
प्रभाग १० मध्ये मतदारांनी माजी आ. राधाकृष्ण होके पाटील यांचे पुतणे अभय होके पाटील , भाजपा सोशल मीडिया सेलचे दत्ता महाजन, भाजपाचे शहराध्यक्ष विनायक रत्नपारखी , मुंबई बाजार समितीचे माजी सभापती अशोक डक यांचे पुतणे अजिंक्य डक , माजी नगराध्यक्ष सुमनबाई मुंडे यांना मतदारांनी नाकारले तर माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांना केवळ १२७ मते मिळाल्याने त्यांना आपले डिपॉझिटही वाचवता आले नाही.