रक्तसाठा मुबलक ठेवा; डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, सचिवांच्या आरोग्य विभागाला सुचना
By सोमनाथ खताळ | Updated: May 9, 2025 18:33 IST2025-05-09T18:30:53+5:302025-05-09T18:33:27+5:30
डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देऊ नयेत, तसेच सुट्टीवरील अधिकाऱ्यांना कर्तव्यावर हजर होण्यास सांगा.

रक्तसाठा मुबलक ठेवा; डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, सचिवांच्या आरोग्य विभागाला सुचना
बीड : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताकडून पाकिस्तावर हल्ला चढविला जात आहे. त्यानुषंगाने लष्कराच्या सर्व दलाच्या सुट्ट्या रद्द केल्या. त्याप्रमाणेच आरोग्य विभागालाही सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देऊ नयेत, तसेच सुट्टीवरील अधिकाऱ्यांना कर्तव्यावर हजर होण्यास सांगा. प्रत्येक रक्तपेढीत मुबलक रक्त साठा उपलब्ध ठेवा, अशा सुचना आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी आरोग्य विभागतील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
भारत - पाकिस्तान युद्ध आता पेटले आहे. सैन्यदल पाकिस्तानवर आक्रमण करत आहे. यात काही जवानांना विरमरणही आले. याच अनुषंगाने आता लष्कर सज्ज झाले आहे. पाकिस्तानकडून हल्ला झाला तरी आपली यंत्रणा सतर्क असायला हवी, यासाठी शुक्रवारी आरोग्य सचिव विरेंद्र सिंह यांनी ऑनलाईन बैठक घेतली. यामध्ये लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही हजर होते. संचालक, उपसंचालक, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी असे सर्व वरिष्ठ अधिकारी या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते.
औषधीही मुबलक ठेवा
रक्तसाठ्याबरोबरच सर्वच संस्थेमध्ये औषधी मुबलक ठेवा. ऑक्सिजन, व्हेंटीलेटरसह आयसीयू कक्ष सज्ज ठेवा. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आयुषसह इतर सर्व विभागांनाही सतर्क राहण्याच्या सुचना सचिवांनी दिल्या आहेत.
सचिवांनी काढले परिपत्रक
शासनाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनीही सायंकाळच्या सुमारार परिपत्रक काढून काही सुचना केल्या. यात सर्व आरोग्य संस्था या पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवाव्यात, सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यावर हजर असावेत, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहने सर्व आवश्यक जीवनरक्षक प्रणालींसह उपलब्ध असावीत. स्ट्रेचर, अभिकर्मक, ऑक्सीजन आणि इतर जीवनरक्षक प्रणालींची तसेच बेडची उपलब्धता सुनिश्चित करावी. फिरते वैद्यकीय पथक सक्षमपणे कार्यान्वित करावे, सर्व आरोग्य किट, अतिरिक्त डिस्पोजेबल वस्तुंसह शस्त्रक्रिया गृह (ओटी) कार्यान्वित ठेवावे, प्रयोगशाळा संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवाव्यात, आवश्यकतेप्रमाणे मॉक ड्रिल घेण्यात यावे. ब्लॅक आऊट झाल्यास आरोग्य संस्थेची आपत्कालीन सेवा चालू राहतील. मात्र ब्लॅक आऊट पाळण्यासंबंधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाप्रमाणे उचित कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले आहेत.