Maharashtra Cabinet expansion : राष्ट्रवादीत खदखद; मंत्रिपद न मिळाल्याने आमदार प्रकाश सोळंके देणार राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:52 IST2019-12-31T11:01:46+5:302019-12-31T13:52:59+5:30
आमदार सोळंके राजीनामा देण्यावर ठाम असून त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे ९ सदस्य, पंचायत समितीचे ३ सभापती व बाजार समितीचे सभापती अशोक डक सुद्धा आहेत.

Maharashtra Cabinet expansion : राष्ट्रवादीत खदखद; मंत्रिपद न मिळाल्याने आमदार प्रकाश सोळंके देणार राजीनामा
माजलगाव (जि. बीड) : एक टर्म वगळता सलग चार वेळा माजलगावचे आमदार राहिलेले प्रकाश सोळंके हे सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत राजीनामा देणार आहेत. स्वत: सोळंके यांनीच सोमवारी ही माहिती दिली. दरम्यान, आमदार सोळंके हे राजीनामा देण्यासाठी पहाटेच पुण्यावरून मुंबईला रवाना झाले आहेत. राजीनामा देण्यावर ते ठाम असून त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे ९ सदस्य, पंचायत समितीचे ३ सभापती व बाजार समितीचे सभापती अशोक डक सुद्धा आहेत.
२००४ मध्ये माजलगाव मतदारसंघातून निवडून आल्यानंतर सलग १५ वर्षे ते आमदार राहिले. २००९ मध्ये त्यांना राज्याचे सहकार राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यानंतर अवघ्या साडेतीन वर्षातच सुरेश धस यांच्यामुळे त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदीलाटेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिले व मतदार संघात त्यांनी राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळवून दिले. तसेच सोमवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापती-उपसभापती पदाच्या निवडीत देखील मतदारसंघात राष्ट्रवादीचा वरचष्मा ठेवण्यात त्यांना यश आले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बीड जिल्ह्यात भाजपाचा वारू मिरवत होता तरी, माजलगाव मतदार संघात मात्र त्यांनी भाजपाला रोखून धरलेले होते.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात प्रकाश सोळंके यांचे नाव पक्के असल्याचे बोलले जात होते. सोळंके यांचे पवार काका- पुतण्या दोघांशी असलेले संबंध व त्यांची पक्षावरील निष्ठा आणि पाठीशी असलेला अनुभव पाहता किमान राज्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल अशी अपेक्षा त्यांना होती. कार्यकर्त्यांमध्येही उत्साह वाढला होता. मात्र सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रकाश सोळंके यांना स्थान न मिळाल्याने मतदार संघात निराशेचे वातावरण पसरले. स्वत: प्रकाश सोळंके हे देखील नाराज झाले. ३१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. या बाबत त्यांना फोनद्वारे विचारणा केली असता त्यांनी यास दुजोरा दिला.
पदाधिकारीही देणार राजीनामे?
प्रकाश सोळंके यांच्याकडे नऊ जिल्हा परिषद सदस्य आणि तीन पंचायत समिती सभापती आहेत. हे सर्वजण मंगळवारी सोळंके यांच्या समर्थनार्थ राजीनामे देणार असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांवर बीड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडी आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय गोटात खळबळ माजली आहे.