नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांनी दोन ट्रस्टींवर डागली तोफ, गंभीर आरोपांनी वाद पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 18:17 IST2025-07-16T18:16:29+5:302025-07-16T18:17:20+5:30

ट्रस्टी बळीराम गवते, सीए जाधव यांच्यावर महंत शिवाजी महाराजांनी केले गंभीर आरोप

Mahant Shivaji Maharaj of Narayangad rises serious allegations on two trustees, sparked a controversy | नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांनी दोन ट्रस्टींवर डागली तोफ, गंभीर आरोपांनी वाद पेटला

नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांनी दोन ट्रस्टींवर डागली तोफ, गंभीर आरोपांनी वाद पेटला

बीड : धाकटी पंढरी म्हणून राज्यभरात ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायणगडाचा वाद आता पेटला आहे. महंत शिवाजी महाराज यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत विश्वस्त बळीराम गवते आणि सीए बी. बी. जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले. २५ कोटी रुपयांच्या कामासाठी या दोघांनी गडाची बदनामी केली. तसेच पुतळा बसविण्याच्या नावाखाली पैसे जमा केल्याचा आरोप त्यांनी केला, तर हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा गवते आणि जाधव यांनी केला असून, दोन दिवसांत सर्व पुरावे देऊ, असे सांगितले. परंतु लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या धाकट्या पंढरीचा वाद पेटल्याने आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

दि. ११ मार्च २०२५ रोजी नगर नारायण महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महंत शिवाजी महाराज यांनी आपले भाचे महंत संभाजी महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर १५ दिवसांपासून त्यावरून धुसफूस सुरू होती. नारायणगडावर या संदर्भात बैठक घेऊन संभाजी महाराज यांच्या नियुक्तीला विरोधही करण्यात आला होता. तेव्हापासून हा गड चर्चेत आला होता. आता याच सर्व वादावर खुद्द महंत शिवाजी महाराज यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. गडाची बदनामी भक्तांनी नव्हे तर आपणच नियुक्त केलेल्या विश्वस्तांनी केली. यात त्यांनी गवते आणि जाधव यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. आता हे दोन्ही विश्वस्तही या आरोपांना उत्तर देणार असल्याने हा वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.

भक्तांनी शिव्या, जोडे मारले तरी गप्प बसेल
गडाची बदनामी कोणी भक्त करत नसून ट्रस्टी करत आहेत. भक्तांनी शिव्या दिल्या जोडे मारले तरी मी वर पाहणार नाही. पण जे ट्रस्टी नेमले त्यांनीच आरोप, घाणाघात केला. १५ दिवसांपासून जेवलो, झोपलो का हे सुद्धा कोणी विचारले नाही. मी व्यथित झालो. मला हे सहन होत नसल्यानेच माध्यमांसमोर आल्याचे महंत शिवाजी महाराज यांनी सांगितले. महादेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भक्तांची गर्दी येथे जमली होती.

विश्वस्त माळकरी असावेत
यापुढे गडाचे विश्वस्त हे माळकरी असावेत. आतापर्यंत दबावामुळे मी गप्प होतो, कारण हे परमार्थाचे क्षेत्र आहे. पण आता शांत बसणार नाही. यापुढे गडाशी जोडलेल्या प्रत्येक गावातून दोन मुले असे १०० मुले गडाचे काम पाहतील. जर कोणी मध्ये बोलले तर हीच मुले कारवाई करतील, असा दावाही महंत शिवाजी महाराजांनी केला.

२५ कोटींच्या कामासाठी धडपड
स्व.विनायक मेटे यांनी गडासाठी २५ कोटी रुपयांचा निधी आणला होता. परंतु तो आपणच आणला असून हे कामे आम्हालाच मिळावी, असे जाधव, गवते यांना वाटत होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी पैसे जमा केले, परंतु तो अद्यापही बसवला नाही, असा आरोप महंत शिवाजी महाराज यांनी केला. जाधव यांनी ऑडिट केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

गवते, जाधव काय म्हणतात?
महंत शिवाजी महाराज यांच्या आरोपानंतर जाधव आणि गवते यांनीही संवाद साधला. हे आरोप तथ्यहीन असून, महाराज कोणाच्या दबावाखाली बोलले, याचा शाेध घ्यायला हवा. ऑडिट, पुतळा, टेंडरचे सर्व पुरावे आहेत. पुढील दोन दिवसांत माध्यमांसमोर सर्व पुरावे देऊ, असा दावा या दोघांनीही केला. आम्ही पिढ्यानपिढ्या गडाची सेवा करतोत. आमच्यावर हे आरोप आजच का केले? का कोणी करायला लावले? यामागे कोण आहे? याचा शोध घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Mahant Shivaji Maharaj of Narayangad rises serious allegations on two trustees, sparked a controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड